मेलबर्न : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी दिलासा देणारे वृत्त आहे. भुवनेश्वर कुमार मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता बळावली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वरने नेट््समध्ये फलंदाजीचा सराव केला. सराव सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमारच्या टाचेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळता आले नाही. त्याचा पर्याय म्हणून धवल कुलकर्णीला पाचारण करण्यात आले होते. भारताला अॅडिलेड व ब्रिस्बेनमध्ये भुवनेश्वर कुमारची उणीव भासली. या दोन्ही सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला. भुवनेश्वरने आज फलंदाजीचा सराव केल्यामुळे २६ डिसेंबरपासून एमसीजीमध्ये प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता बळावली आहे. ब्रिस्बेन कसोटीनंतर भुवनेश्वरने नेट््समध्ये गोलंदाजीचा सराव केला होता, पण त्याच्या टाचेवर पट्टी होती. त्याने गोलंदाजीच्या सरावानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासोबत चर्चा केली होती. भुवनेश्वरने आज गोलंदाजीचा सराव केला नाही. कारण आज सरावादरम्यान पावसाने हजेरी लावली. त्याच्या फिटनेसबाबत लवकरच निर्णय होणार आहे. (वृत्तसंस्था)
भुवी तिस-या कसोटीत खेळेल?
By admin | Published: December 24, 2014 1:52 AM