कोलकाता : गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून कुठल्याही गोलंदाजासाठी पुनरागमन करणे कठीण असते. मोहम्मद शमी मात्र वेगवान माऱ्यातील लय मिळविण्यासाठी कठोर सराव करीत आहे. भारतीय संघाला टी-२० विश्वचषकात त्याच्याकडून मोठी कामगिरी अपेक्षित असल्याचे मत सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध शमीचे नाव संघात होते पण जखमेमुळे त्याला संघाबाहेर पडावे लागले.शमीने जखमेतून सावरल्यानंतर विंडीजविरुद्ध काल ३० धावा देत दोन गडी बाद केले होते. रोहित म्हणाला, गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून कुण्याही गोलंदाजासाठी वेगवान मारा करणे कठीण असते. शमी याला अपवाद ठरला. त्याने विंडीजविरुद्ध टिच्चून मारा करीत दोन गडी बाद केले. त्याने या दरम्यान बाऊन्सर, यॉर्कर तसेच मंद चेंडू टाकले. आम्हाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नेटमध्ये घाम गाळल्याने शमी हे करू शकला.’फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात वर्चस्व राखल्यामुळेच भारतीय संघ बलाढ्य बनल्याचे सांगून रोहित म्हणाला, ‘तिन्ही विभागार सरस कामगिरीमुळेच आम्ही लागोपाठ ११ सामने जिंकण्यात यशस्वी होऊ शकलो. माझ्या सहकाऱ्यांनी बरोबरीचे योगदान दिल्यामुळेच हे साध्य होऊ शकले.’ (वृत्तसंस्था)
शमीकडून मोठी अपेक्षा : रोहित शर्मा
By admin | Published: March 11, 2016 11:35 PM