मुंबई : जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हक्काचे एक पदक हुकले आहे. कारण भारताची महिला कुस्तीपटूविनेश फोगटला दुखापत झाली असून आता तिला या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे भारतासाठी हा मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे. कारण आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
" विनेश ही लखनौ येथे कुस्तीचा सराव करत होती. यावेळी तिच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीवर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. वैद्यकीय चाचणीचा अहवाल आमच्या हाती आला असून त्यानुसार विनेशला जागतिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. हा भारतासाठी फार मोठा धक्का आहे, " असे भारतीय कुस्ती महासंघाने म्हटले आहे.
या दुखापतीबद्दल विनेश म्हणाली की, " हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेपूर्वी मला दुखापत होणं, हे दुर्देवी आहे. कारण मी चांगल्या फॉर्मात होती आणि या स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी मी सज्ज होते. पण आता दुखापतीमुळे मला या स्पर्धेत खेळता येणार नाही. "