Amit Rohidas Red Card, Hockey India, Paris Olympics 2024: भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये ( India vs Germany Semifinal ) सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला. भारताने निर्धारित सामना १-१ अशा बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतीय आक्रमण ग्रेट ब्रिटनवर भारी पडले. भारताने ४-२ने सामना जिंकला. आता भारताचा सेमीफायनलचा सामना जर्मनीविरूद्ध होणार आहे. त्याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार डिफेंडर म्हणजे बचावपटू अमित रोहिदास याला जर्मनीविरूद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे.
स्टार बचावपटू अमित रोहिदासला ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रेड कार्ड मिळाले होते. त्यामुळे आता त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच मंगळवारी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या ऑलिम्पिक उपांत्य फेरीत तो खेळू शकणार नाही. म्हणजेच भारताला १५ खेळाडूंसह सामन्याची रणनिती आखावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अमित रोहिदासला ४ ऑगस्ट रोजी भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान FIH आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा परिणाम म्हणून सामना क्रमांक ३५ (भारत वि. जर्मनी - उपांत्य फेरी) मध्ये अमित रोहिदासला सहभागी होता येणार नाही. भारत केवळ १५ खेळाडूंचाच वापर करु शकेल.
भारताचा उपांत्यपूर्व फेरीत रोमहर्षक विजय
सामन्याच्या पूर्वार्धात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीलाच भारताच्या अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे उर्वरित सामना भारताला १० खेळाडूंसोबत खेळावा लागला होता. २२व्या मिनिटाला भारताकडून हरमनप्रीतने गोल केला. तर २७व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनच्या ली मॉर्टन याने गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात पुन्हा गोल झाला नाही. निर्धारित वेळेत सामना १-१ असा सुटल्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णय घेण्याचे ठरले. त्यात भारताने ग्रेट ब्रिटनला ४-२ असे पराभूत करत सेमीफायनल गाठली.