बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय
By admin | Published: July 12, 2015 9:58 PM
मीरपूर : डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफीजूर रहमान आणि ऑफस्पिनर नासीर हुसेन यांच्या शानदार कामगिरीनंतर सौम्य सरकारच्या सुरेख फलंदाजीच्या बळावर बांग्लादेशने दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३४ चेंडू आणि ७ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.
मीरपूर : डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफीजूर रहमान आणि ऑफस्पिनर नासीर हुसेन यांच्या शानदार कामगिरीनंतर सौम्य सरकारच्या सुरेख फलंदाजीच्या बळावर बांग्लादेशने दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३४ चेंडू आणि ७ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.पहिला सामना गमावल्यानंतर बांगलादेशने आजच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या दक्षिण आफ्रिकेला ४६ षटकात १६२ धावांत गुंडाळल्यानंतर सरकार (७९ चेंडूंत नाबाद ८८) आणि महमुदुल्लाह (५0) यांनी तिसर्या गड्यासाठी केलेल्या १३५ धावांच्या भागीदारीच्या बळावर २७.४ षटकांत ३ बाद १६७ धावा करीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले स्थान निश्चित केले.२००७ नंतर बांगलादेशचा हा दक्षिण आफ्रिकेवर पहिलाच विजय आहे. गेल्या १९ सामन्यात १४ सामने जिंकणार्या बांगलादेशाच्या विजयाचा पाया रचला तो गोलंदाजांनी. गेल्या महिन्यात भारतीय फलंदाजांवर दहशत निर्माण करणार्या मुस्तफीजूर आणि नासीर यांनी अनुक्रमे ३८ व २८ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद करीत बांगलादेशच्या विजयात निर्णयाक योगदान दिले. रुबेल हुसेनने ३४ धावांत २ गडी बाद करीत त्यांना साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ४१ धावा केल्या तर फरहान बेहारडीनने ३६ धावा केल्या. याशिवाय कर्णधार आमलाने २२ धावा केल्या.त्यानंतर कॅगिसो रबादा (२/४५) याने तमीम इकबाल (५) व लिन दास (१७) यांना लवकर बाद केले; परंतु सरकार व महमुदुल्लाह यांनी दक्षिण आफ्रिकेला डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. इम्रान ताहीरला षटकार ठोकत बांगलादेशचा विजय निश्चित करणार्या सरकारने १३ चौकार मारले.त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रारंभापासूनच धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि नियमित अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. विशेष म्हणजे ३२ व्या षटकात त्यांची धावसंख्या १00 वर पोहोचली होती आणि त्यानंतर लगेच जेपी ड्युमिनी (१३) याच्या रूपाने त्यांनी सहावा फलंदाज गमावला होता............................................संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका : ४६ षटकांत सर्वबाद १६२. (फरहान बेहारडीन ३६, फाफ डू प्लेसिस ४१, आमला २२, मुस्तफीजूर रहमान ३/३८, नासिर हुसैन ३/२६, रुबेल हुसेन २/३४).बांगलादेश : २७.४ षटकात ३ बाद १६७. (सौम्या सरकार नाबाद ८८, महमुदुल्लाह ५0. कॅगिसो रबादा २/४५).