ऑनलाइन लोकमत
सेंच्युरियन, दि. 30 - जलदगती गोलंदाज डेल स्टेनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आज येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला २0४ धावांनी पराभूत करुन मालिका १-0 अशी जिंकली. स्टेनने या सामन्यात दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद करताना ३३ धावांत पाच बळी घेतले. पहिल्या डावातही त्याने ३ बळी घेतले होते. स्टेनने २६ वेळा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे.दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला विजयासाठी ४00 धावांचे लक्ष्य दिले होते, पण त्यांना १९५ धावाच करता आल्या. पहिला डाव आठ बाद ४८१ धावांवर घोषित करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डावही ७ बाद १३२ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात २१४ धावा केल्या होत्या. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरवात चांगली झाली नाही. केवळ १९ धावांतच आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. यात कर्णधार केन विल्यम्सनचाही समावेश होता. अशा संकटाच्या वेळी हेन्री निकोल्सने ७६ धावांची झुंजार खेळी केली. बीजे वॉटलिंगने ३२ आणि डग ब्रेसवेलने ३0 धावा करुन पराभवातील अंतर कमी केले. स्टेनने निकोल्सला रबाडाकरवी झेलबाद करुन आपला पाचवा बळी घेतला आणि न्यूझीलंडचा डाव संपवला. दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकावणाऱ्या क्विंटन डि कॉकला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.संक्षिप्त धावफलकदक्षिण आफ्रिका प. डाव : ८ बाद ४८१ (घोषित)न्यूझीलंड प. डाव : सर्वबाद २१४दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ७ बाद १३२ (घोषित)न्यूझीलंड दुसरा डाव सर्वबाद १९५. (हेन्री निकोल्स ७६, बीजे वॉटलिंग ३२, डग ब्रेसवेल ३0 धावा. डेल स्टेन ५/३३.)