बंगळुरू : अनिल कुंबळे भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर क्रिकेटच्या विकासासाठी हालचालींना वेग येत आहे. याचाच प्रत्यय रविवारी आला. प्रशिक्षक अनिल कुंबळे, कसोटी कर्णधार विराट कोहली, वन-डे कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड या दिग्गजांनी क्रिकेटच्या विकासावर गंभीर चर्चा केली. या दिग्गजांसोबत राष्ट्रीय निवडकर्ते संदीप पाटील, महाव्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर, एनसीए फलंदाजी प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमन, गोलंदाजी प्रशिक्षक नरेंद्र हिरवानी आणि फिजिओ अॅण्ड्र्यू लिपस यांचा समावेश होता. सूत्रानुसार, भारतीय ‘अ’ संघ आणि वरिष्ठ संघ यांच्यात एकजूट निर्माण करण्यावर भर देण्यात आला. धोनीने बेंच स्ट्रेंथकडे लक्ष वेधत आपले मत मांडले. कारण नुकताच झिम्बाब्वेविरुद्ध धोनीने ‘अ’ संघातील खेळाडूंचा समावेश असलेला संघ निवडला होता. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना अधिक संधी मिळावी, यावरही जोर देण्यात आला. देशात चांगल्या फिरकीपटूंची कमतरता आहे. रविचंद्रन आश्विन आणि अमित मिश्रा यांच्यासाठी आव्हान नाही. जयंत यादव, यजुवेंद्र चहल आणि शाहबाज नदीम यासारखे गोलंदाज दावेदारी सिद्ध करीत आहेत. असे असले तरी ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर बरेच अवलंबून असेल. येत्या आॅगस्टपासून ‘अ’ संघ आॅस्ट्रेलियादौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा महत्त्वपूर्ण असेल. या दौऱ्यातून कर्णधार विराट कोहली अणि प्रशिक्षक कुंबळे यांना खेळाडूंना पारखण्याची संधी मिळेल. दुखापत आणि फॉर्म अशा स्थितीत पर्याय शोधणे हे कुंबळे आणि विराटसाठी या दौऱ्यातून चांगलेठरेल. (वृत्तसंस्था)
दिग्गजांची ‘फ्युचर प्लॅनिंग’ मीटिंग!
By admin | Published: July 04, 2016 5:48 AM