टोकियो : कोरोनामुळे टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभर लांबणीवर टाकण्यात आल्याने आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीला कोट्यवधी डॉलरचा फटका बसेल, असे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितले. उशिरा आयोजनामुळे आयओसीचे कित्येक डॉलर जास्तीचे खर्च होणार आहेत.जर्मनीतील एका वृत्तपत्राशी बोलताना बाक यांनी उपरोक्त विधान केले.
जपानने काढलेल्या अंदाजानुसार आॅलिम्पिक स्थगित झाल्याने याचा मूळ खर्च दोनवरून सहा अब्ज डॉलरने वाढणार आहे. २०१३ च्या समझोत्यानुसार आयओसीचा वाटा वगळता अन्य अतिरिक्त वाढीव रकमेचा खर्च जपान करणार आहे. कोरोनामुळे आयओसीला किती नुकसान झाले याचा वेध घेणे सध्यातरी कठीण असल्याचे बाक यांनी सांगितले. ‘आयओसी स्वत:चा वाटा देण्यास कटिबद्ध असून जपान वाढीव रकमेचा खर्च उचलेल यावर आमची सहमती झाली. तथापि एक खरे की आयओसीलादेखील कित्येक कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागेल,’ असे बाक यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)