नवी दिल्ली : भारताचा एकमेव वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा व राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना क्रीडा मंत्रालयाने आठ सदस्यीय कृतिदलात समाविष्ट केले आहे. हे दिग्गज पुढील ३ आॅलिम्पिकसाठी आराखडा तयार करतील.रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताला फक्त दोनच पदकांवर समाधान मानावे लागले होते. आॅलिम्पिक संपल्याच्या काही दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतिदलाची घोषणा केली होती. हे कृतिदल २०२०, २०२४ आणि २०२८मध्ये होणाऱ्या पुढील ३ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंसाठी ‘प्रभावी सहभागा’साठीची योजना तयार करण्यास मदत करतील.या कृतिदलात बिंद्रा व गोपीचंद यांच्याशिवाय माजी भारतीय हॉकी कर्णधार वीरेन रासक्विन्हा याचादेखील समावेश आहे. कृतिदलात पाच अन्य सदस्यांत स्कूल प्रमोशन बोर्डाचे प्रमुख ओम पाठक, हॉकी प्रशिक्षक एस. बलदेवसिंग, प्रोफेसर जी. एल. खन्ना, पत्रकार राजेश कालरा व गुजरात क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक संदीप प्रधान यांचा समावेश आहे. या कृतिदलाची घोषणा करताना क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पत्रकारांना या समितीचा कार्यकाळ ३ महिने अथवा अहवाल सादर करेपर्यंत असेल, असे सांगितले. अंतिम अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सोपवला जाईल, असेही ते म्हणाले.
बिंद्रा, गोपीचंद आगामी तीन आॅलिम्पिकसाठी कृतिदलात
By admin | Published: January 31, 2017 4:37 AM