जगभरात लोकप्रिय असलेल्या WWE या कुस्ती स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करणारा द ग्रेट खली म्हणजेच दलीप राणा सिंह याचा आज वाढदिवस. खलीने आज देशातच नाही तर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. WWE मध्ये जाणारा तो पहिला भारतीय पेहलवान तर आहेच सोबतच तो सर्वात लोकप्रियही आहे. खलीवर लिहिण्यात आलेल्या 'द मॅन हू बिकेम खली' या पुस्तकात त्याच्या जीवनातील जीवनातील वेगवेगळ्या बाजू मांडण्यात आल्या आहेत. आज त्याचा ४७वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्याच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ....
अडीच रुपयांसाठी शाळेतून काढले होते
खली जेव्हा शाळेत शिकत होता तेव्हा एक वेळ अशी आली होती की, त्याच्या परिवाराकडे शाळेची फि भरण्यासाठी अडीच रुपये नव्हते. खलीने त्याच्या पुस्तकात सांगितले आहे की, १९७९ मध्ये त्याला शाळेतून काढण्यात आले होते. कारण त्यावेळी दुष्काळ आला होता आणि पिक झालं नव्हतं. घरच्यांकडे त्याची फि भरायलाही पैसे नव्हते.
सहन केला अपमान
शाळेतील शिक्षकांनी जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांसमोर खलीचा अपमान केला तेव्हा खली खूप नाराज झाला होता. शाळेतील मुलांनी त्याची खिल्ली उडवली होती. त्यानंतर तो पुन्हा शाळेत कधी गेला नाही. तो मजूरी करायला जावू लागला.
५ रुपयांसाठी केली होती मजूरी
खलीच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तेव्हा तो आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी मजूरी करायला जावू लागला होता. तो ८ वर्षांचा असातानापासून मजूरी करु लागला. त्यासाठी त्याला केवळ ५ रुपये मिळायचे. ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. कारण त्याला केवळ अडीच रुपयांसाठी शाळेतून काढले होते.
पोलिसात भरती
खली पंजाब पोलिसात असताना बॉडी बिल्डींग करायचा. खलीने १९९७ ते १९९८ मध्ये मिस्टर इंडिया हा किताब मिळवला होता. त्याच्या प्रतिभेने प्रभावित झाल्याने देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी त्याला राष्ट्रपती भवनात भेटायलाही बोलवले होते.
किती आहे खलीची उंची?
खलीची उंची ७ फूट १ इंच आहे तर त्याचं वजन १५७ किलो आहे. खलीची छाती ६३ इंचाची आहे. खलीला बालपणापासून एक्रोमेगली नावाचा आजार होता ज्यामुळे त्याचं शरीर असाधरण प्रकारे वाढलं. खलीच्या आजोबांची उंची ६ फूट ६ इंच होती.
आणखीही काही खास गोष्टी
१) इतर पेहलवानांपेक्षा खली खूप वेगळा आहे. तो खूप धार्मिक आहे. तो मांस, मद्य, ड्रग्स, कॅफिन, तंबाखू काहीही खात नाही.
२) त्याचं द ग्रेट खली हे नाव हिंदू देवी काली मातेवरुन देण्यात आलं आहे.
३) खलीला ६ भाऊ आहेत. त्याच्या वडिलांचं नाव ज्वाला राम तर आईचं नाव तांदी देवी आहे.
४) ७ एप्रिल २००६ मध्ये त्याने अंडरटेकरची धुलाई करत स्मॅकडाऊनमध्ये सुरुवात केली होती.
५) २०१२ पर्यंत त्याने ४ हॉलिवूड, २ बॉलिवूड आणि एका फ्रान्सच्या सिनेमात काम केलं आहे.
६) २८ मे २००१ मध्ये खलीच्या एका फटक्यामुळे ब्रायन ओन्गचा मृत्यू झाला होता.