Divya Kakran, BJP vs AAP: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची दिव्या काकरा हिने कांस्यपदकाची कमाई केली. कुस्ती या क्रीडा प्रकारात दिव्याने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ६८ किलो वजनी गटात टोंगा देशाच्या टायगर लिली कॉकर लिमाली हिला चितपट करत सामना खिशात घातला. मात्र दिव्याबद्दल आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी एक विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावरून आता भाजपाचे शहजाद पूनावाला यांनी आप पक्षावर टीका केली आहे. भारद्वाज यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न विचारला होता.
भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आम आदमी पक्षाच्या सौरभ भारद्वाज यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. दिव्या काकरा हिने अशी भावना व्यक्त केली होती की तिने पदक मिळवूनदेखील तिला दिल्ली सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सन्मान किंवा बक्षीस जाहीर झाले नाही. यावर कुस्तीपटू आणि कॉमनवेल्थ गेम्समधील पदकविजेती खेळाडू दिव्या काकरा हिला उत्तर देताना आपचे सौरभ भारद्वाज म्हणाले की, दिव्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व केले नाही, ती उत्तर प्रदेशची खेळाडू आहे. तोच एक स्क्रीन शॉट शेअर करत भाजपाने त्यांच्यावर टीका केली.
"(आपच्या सौरभ भारद्वाज यांचे) ट्वीट म्हणजे एखाद्या खेळाडूचा, युवा पिढीचा आणि तिरंग्याचा अपमान आहे. स्टेडियम असो किंवा युद्धाचे मैदान... भारतीय जवान आणि भारतीय खेळाडू हे भारताची मान उंचावण्यासाठी संघर्ष करत असतात. 'तू कोणत्या राज्यातून आहेस', असे दिव्या काकरा सारख्या पदक विजेत्या खेळाडूने विचारणे आणि अशा प्रकारचे विधान करणाऱ्या सौरभ भारद्वाज यांना असं विधान करण्यापासून अरविंद केजरीवाल यांनी रोखलं नाही यावरून आम आदमी पक्षाची 'नियत' कशी आहे ते समजते. अशाच वादविवादांसाठी आम आदमी पक्ष लोकप्रिय आहे. हा एका अर्थाने महिलांचा आणि विशेषकरून युवा पिढीतील महिला खेळाडूंचा अपमान आहे", अशी अतिशय जहरी टीका पूनावाला यांनी केली.
मोहित भारद्वाज यांचे ट्वीट-
"भगिनी, संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. पण तू दिल्लीसाठी खेळल्याचे मला आठवत नाही. तुम्ही नेहमीच उत्तर प्रदेशकडून खेळत आला आहात. पण खेळाडू हा देशाचा असतो. असे असले तरी तुम्हाला योगी आदित्यनाथ यांच्याकडून सन्मान नको आहे असं दिसते. मला वाटते दिल्लीचे मुख्यमंत्री तुमचे म्हणणे नक्कीच ऐकतील", असे ट्वीट सौरभ भारद्वाज यांनी केली होते. तसेच, "कदाचित मी चूकत असेन, पण जेव्हा मी शोधले तेव्हा मला आढळले की तू नेहमीच उत्तर प्रदेशकडून खेळत आहेस, दिल्ली राज्याकडून नाही. आज संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे. मी देवाला प्रार्थना करतो की तू पुढे जात राहशील", असेही भारद्वाज यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.