ऑनलाइन लोकमत/केदार लेले हॉलंड, दि. 22 - टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत पोलंडच्या वॉएटशेक विरुद्ध विजय मिळवत भारताच्या अधिबन याने आपली या स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. दिमित्री आंद्रेकिन याने पेंटेला हरिकृष्णला बरोबरीत रोखले. ज्यामुळे पेंटेला हरिकृष्णला आणखी एका बरोबरीवर समाधान मानावे लागले. कॅराकिनने अरोनियनवर विजय मिळवला, तसेच वीईने ल्युक फॅन वेलीवर सफाईदार विजय मिळवला. अनुक्रमे मॅग्नस कार्लसन वि. अनिष गिरी, वेस्ली सो वि. एल्यानॉव आणि नेपोम्नियाची वि. रिचर्ड रॅपोर्ट यांच्यातील लढती बरोबरीत सुटल्या.नाट्यपूर्ण सातवी फेरी - प्रेक्षकांना एक अनोखा नजराणा! टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या नाट्यपूर्ण सातव्या फेरीत बऱ्याच डावांमध्ये संधी गवसल्या आणि दवडल्या गेल्या. नाट्यपूर्णरीत्या गवसलेल्या आणि दवडलेल्या संधींवर टाकूयात एक धावती नजर!गवसलेल्या संधींची कधी माती, कधी सोनेगवसलेल्या आणि दवडलेल्या संधींचा श्रीगणेशा कॅराकिन वि. अरोनियन या लढतीपासून सुरू झाला. अरोनियनने १०व्या चालीवर केलेल्या चुकीचा फायदा कॅराकिन उठवू शकला नाही, त्यामुळे प्रेक्षक आणि समीक्षक यांच्यात काही काळासाठी कुजबुज रंगली. अखेर एका प्रदीर्घ डावात कॅराकिन याने अरोनियनवर विजय मिळवला! कॅराकिन वि. अरोनियन यांच्यातील डावामधील कुजबुज सुरू असताक्षणीच एल्यानॉव याने वेस्ली सो विरुद्ध मिळालेल्या संधीची माती केली. परिणामी वेस्ली सो वि. एल्यानॉव यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. त्यानंतर रंगली ती म्हणजे वॉएटशेक वि. अधिबन यांच्यातील लढत.वॉएटशेक वि. अधिबनवेगवेगळ्या प्रकारे डावांची सुरुवात आणि बचाव पद्धती अवलंबून ह्या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्यचकित करण्यात अधिबन याने सफलता मिळवली आहे! उत्तम तयारीचा नमुना सादर करीत अधिबन याने वॉएटशेक विरुद्ध लवकरच डावावर पकड घेतली. डावाच्या मध्यावर अधिबनची पकड ढिली झाली आणि डाव बरोबरीत सुटेल अशी चिन्ह दिसू लागली. अशातच वॉएटशेक याने काही आक्रमक चाली रचल्या आणि डावाचे पारडे आपल्या बाजूला झुकवले. अधिबन पराभवाच्या छायेत पोहोचला असताना वॉएटशेकने मिळालेली संधी दवडली. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवित प्रदीर्घ डावात अधिबन याने पूर्ण गुण वसूल केले.मॅग्नस कार्लसन वि. अनिष गिरीप्रदीर्घ झालेल्या ह्या डावात विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला ५६व्या चालीवर तीन चालीत मात करून अनिष गिरीवर विजय मिळवण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती. पण ही संधी मॅग्नस कार्लसनने दवडली आणि पुन्हा एकदा प्रेक्षक आणि समीक्षक यांच्यात काही काळासाठी कुजबुज रंगली. मिळालेल्या या जीवदानाचा अनिष गिरी याने पुरेपूर फायदा उठविला. अखेर ७ तास रंगलेली ही नाट्यपूर्ण प्रदीर्घ लढत बरोबरीत सुटली. मॅग्नस कार्लसनच्या चेहऱ्यावर हताश भाव दिसून आला तर अनिष गिरीने सुटकेचा निःश्वास सोडला!सातव्या फेरीअखेर गुणतालिका1 वेस्ली सो - 5.0 गुण2. कार्लसन, एल्यानॉव, वीई - 4.5 गुण प्रत्येकी5. कॅराकिन, गिरी - 4.0 गुण7. अरोनियन, हरिकृष्ण, अधिबन, आंद्रेकिन - 3.5 गुण प्रत्येकी 11. वॉएटशेक - 3.0 गुण12. नेपोम्नियाची - 2.5 गुण 13. रॅपोर्ट - 2.0 गुण14. ल्युक फॅन वेली - 1.0 गुणरविवार 22 जानेवारी 2017 रोजी - अशी रंगेल आठवी फेरीलेवॉन अरोनियन वि. अनिष गिरीअधिबन वि. दिमित्री आंद्रेकिनपेंटेला हरिकृष्ण वि. वीईल्युक फ़ॅन वेली वि. इयान नेपोम्नियाचीरिचर्ड रॅपोर्ट वि. मॅग्नस कार्लसनसर्जी कॅराकिन वि. वेस्ली सोपॅवेल एल्यानॉव वि. वॉएटशेक
काळ्या मोहऱ्यांनी अधिबनचा दुसरा विजय; हरिकृष्णची पुन्हा बरोबरी
By admin | Published: January 22, 2017 5:30 PM