झुरिच : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या फिफाच्या नैतिक लवादाने सोमवारी सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. प्लातिनी यांच्यावर २० लाख फ्रँक्स प्रदान करण्याच्या प्रकरणात पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. विश्व फुटबॉलमधील दोन दिग्गज व्यक्तींविरुद्धच्या या निर्णयामुळे जगातील सर्वांत लोकप्रिय खेळात सुरू असलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ब्लाटर व प्लातिनी यांना फुटबॉलच्या कुठल्याही प्रकारात सहभागी होण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. ७९ वर्षीय ब्लाटर यांची कारकीर्द यामुळे जवळजवळ संपुष्टात आली आहे, तर फिफाचे अध्यक्षपद भूषवण्याच्या प्लातिनी यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. १९९८ पासून फिफाचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या ब्लाटर यांच्यावर ५० हजार स्विस फ्रँक्स (सुमारे ३३ लाख ३९ हजार ३७४ रुपये) आणि युएफाचे निलंबित अध्यक्ष आणि फिफा उपाध्यक्ष प्लातिनी यांच्यावर ८० हजार फ्रँक्सचा (सुमारे ५३ लाख ४२ हजार ९९८ रुपये) दंड ठोठावण्यात आला. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्लातिनी यांना ब्लाटरतर्फे अधिकृत २० लाख स्विस फ्रँक्स प्रदान करण्यात आल्याची फिफातर्फे चौकशी सुरू होती. १९९९ ते २००२ या कालावधीत सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळल्यामुळे ही रक्कम दिली गेली होती, असे प्लातिनी यांनी सांगितले. फिफाच्या नैतिक लवादाने या दोघांविरुद्धच्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले; पण हितसंबंध गुंतल्याच्या प्रकरणात ते दोषी आढळले. लवादाने म्हटले आहे की, ‘या रकमेबाबत ब्लाटर यांना सुनावणीदरम्यान किंवा लिखित स्वरूपात कुठलेही स्पष्ट कारण देता आले नाही.’प्लातिनी हितसंबंध गुंतल्याच्या प्रकरणी दोषी आढळले. लवादाने स्पष्ट केले की, ‘प्लातिनी यांना विश्वासपात्र व नैतिकतेने काम करण्यात अपयश आले. ते आपले कार्य जबाबदारीने करू शकले नाही. ते फिफाच्या घटनेचा व कायद्याचा आदर राखण्यात सपशेल अपयशी ठरले.’ब्लाटर व प्लातिनी यांच्यावर आॅक्टोबर महिन्यात अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी स्विस तक्रारक र्त्यांनी २०११ च्या रक्कम प्रदान करण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. ब्लाटर यांच्याविरुद्ध गुन्हेविषयक चौकशी सुरू आहे, तर प्लातिनी संशयित व साक्षीदार म्हणून आहेत. आम्ही काहीच चुकीचे केले नसल्याचे या दोघांनी म्हटले आहे. ब्लाटर गेल्या गुरुवारी फिफा मुख्यालयात आठ तास सुनावणीमध्ये सहभागी झाले होते, तर प्लातिनी यांनी बहिष्कार टाकला होता. चार वर्षांपूर्वी झालेल्या या व्यवहारादरम्यान ब्लाटर चौथ्यांदा फिफाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते, तर प्लातिनी यांनी त्यानंतर त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण त्यानंतर ते त्यांच्या विरोधात गेले. ब्लाटर व प्लातिनी यांना फिफाच्या अपिल लवाद, क्रीडा लवाद किंवा स्विस दिवाणी न्यायालयात या बंदीच्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार आहे. ब्लाटर आपल्या सन्मानासाठी दाद मागण्याची शक्यता आहे, तर बंदीच्या निर्णयामुळे प्लातिनी यांच्या फिफा अध्यक्ष होण्याच्या आशेवर पाणी फेरल्या गेल्यामुळे तेही या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)दृष्टिक्षेपात ब्लाटर २९ मे २०१५ : सॅप ब्लाटर प्रिन्स अली बिन हुसेन यांना नमवून पाचव्यांदा फिफाच्या प्रमुखपदी विराजमान.२० जुलै : निवडणूक प्रक्रियेला स्थगिती.८ आॅक्टोबर : फिफाच्या निती समितीने ९० दिवसांसाठी केले निलंबित.भ्रष्टाचार प्रकरण डिसेंबर २०१० : २०१८ व २०२२ मधील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी मतांची खरेदी केल्याचे प्रकरण एका वृत्तपत्राने उघड केले२३ जून २०११ : फिफाच्या निती समितीकडून कॉनकॅकफचे तत्कालीन महासचिव चक ब्लॅझर यांची हकालपट्टीडिसेंबर २०१४ : फिफाच्या तपासणी पथकाचा मायकल गार्सिया यांचा राजीनामा २७ मे २०१५ : झुरीच हॉटेलवर पोलिसांचा छापा, फिफाच्या २ उपाध्यक्षांसह ७ जणांना अटक फिफाच्या नैतिक लवादाने फुटबॉलमधून आठ वर्षांसाठी निलंबित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध दाद मागणार असल्याचे सेप ब्लाटर यांनी स्पष्ट केले. न्यायाधीशांनी साक्षीदारांच्या साक्षीकडे डोळेझाक करताना ‘विश्वासघात’ केला, असे ब्लाटर यांनी म्हटले आहे. हा मुद्दा फिफाच्या अपिल समितीपुढे मांडणार असून, त्यानंतर निलंबनाच्या निर्णयाविरोधात लुसाने येथे क्रीडा लवादापुढे आव्हान देणार आहे. फिफाच्या न्यायधीशांनी प्रदीर्घ कालावधीपर्यंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या ब्लाटर व एकवेळ त्यांचे सहकारी असलेल्या मायकल प्लातिनी यांना २० लाख स्विस फ्रँक (२० लाख डॉलर) रकमेच्या प्रकरणात निलंबनाची कारवाई केली. ब्लाटर यांनी २०११ मध्ये ही रक्कम प्लातिनी यांना कथित प्रकरणी एका दशकापूर्वी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळण्याच्या कार्याचा मोबदला म्हणून दिली होती. ब्लाटर व प्लातिनी यांनी ही देवाणघेवाण वैध असल्याचे म्हटले असून करार मौखिक होता, असेही सांगितले. ब्लाटर म्हणाले, ‘न्यायाधीशांनी मौखिक कराराबाबतची साक्ष फेटाळून लावल्यामुळे आश्चर्य वाटले. तुमच्यासोबत विश्वासघात झाला काय, असे जर तुम्ही मला विचारले तर माझे उत्तर नक्कीच हो असे राहील.’
ब्लाटर, प्लातिनीवर ८ वर्षांची बंदी
By admin | Published: December 22, 2015 3:07 AM