बंगळुरु : टीम इंडियाची भक्कम भिंत म्हणून ओळखला जाणारा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड याची अंध टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय अंध क्रिकेट संघटनेने (सीएबीआय) द्रविडची नियुक्ती केली. आगामी ३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन भारतातील आठ शहरांमध्ये होईल. या स्पर्धेत यजमान भारतासह एकूण १० संघांचा समावेश असून, यामध्ये आॅस्टे्रलिया, बांगलादेश, इंग्लंड, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या संघांचा सहभाग आहे. स्पर्धा साखळी व बाद फेरीच्या आधारे खेळविण्यात येईल.‘‘जी. के. महंतेश यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. माझ्यामते त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची आवश्यकता आहे. त्यांची कामगिरी माझ्या कामगिरीपेक्षा खूप मोठी आहे. मी केवळ जनजागृती करू शकतो. मात्र, त्यांनी अंध क्रिकेटचा खूप विकास केला आहे,’’ अशा शब्दांत द्रविडने सीएबीआयचे अध्यक्ष महंतेश यांचे कौतुक केले.
अंधांच्या क्रिकेटला मिळाली आत्मविश्वासाची भक्कम ‘भिंत’
By admin | Published: November 11, 2016 1:10 AM