बुलडाणा : नुकत्याच झालेल्या दृष्टिहिनांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघात मुळ बुलडाण्याच्या अनिस फखरुल्लाह मिर्झा याने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने राज्याचे प्रतिनिधीत्व केले.रविवारी बंगळुरु येथे दृष्टिहिनांच्या टी - २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला. विजेत्या भारतीय संघात बुलडाण्याजवळ असलेल्या देऊळघाट येथील अनिस फखरुल्लाह मिर्झा याचा समावेश होता. या स्पर्धेत त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, न्युजीलॅड, श्रीलंका, नेपाल, बांग्लादेश, आॅस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्टइंडीज व इंग्लडच्या संघाचा समावेश होता. (प्रतिनिधी)‘लोकल’मध्ये विकतो साहित्य!२८ वर्षीय अनीसचे वडील फखरुल्लाह बेग हे ट्रकचालक आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे ते काही वर्षापूर्वी देउळघाट गाव सोडून नाशिक येथे वास्तव्यास गेले. अनिसने प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधात अनीस सध्या अंबरनाथ येथे राहतो. ‘लोकल’मधून तो वेगवेगळे साहित्य विक्री करतो. हे काम करतानाच त्याने क्रिकेटकडे दुर्लक्ष केले नाही व मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले हे विशेष !
विश्वविजेत्या संघात बुलडाण्याचा अनिस चमकला !
By admin | Published: February 15, 2017 12:31 AM