मुंबई : 5 आणि 6 मार्चला रंगणाऱ्या 15 व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्यभरातील दमदार आणि जोरदार शरीरसौष्ठवपटूंनी दंड थोपटले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आपल्या सुपर फॉर्मात असल्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत किताबासाठी काँटे की टक्कर होणार असल्याची शक्यता महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांनी वर्तवली आहे. सलग पाचवेळा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करणारा सुनीत जाधव जेतेपदाचा विक्रमी षटकार ठोकण्यासाठी सज्ज झाला असला तरी चार दिवसांपूर्वी नवी मुंबईत झालेल्या एनएमएसए श्री स्पर्धेत सुनीत आणि महेंद्र चव्हाणवर मात करून खळबळ माजविणाऱ्या सागर माळीनेही जेतेपदावर आपला दावा केला आहे. एवढेच नव्हे तर नवोदित मुंबई श्री आणि मुंबई श्रीचा किताब जिंकून अनोखा इतिहास रचणाऱया अनिल बिलावाच्या कामगिरीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे संतोष तरे प्रतिष्ठानच्या वतीने महागणपतीच्या साक्षीने टिटवाळानगरीत हजारो क्रीडाप्रेमींना महाराष्ट्र श्रीचे घमासान अनुभवायला मिळणार हे निश्चित झालेय.
आजवर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा असलेली महाराष्ट्र श्री मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या शहरी भागातच आयोजित केली जात होती. मात्र शरीरसौष्ठवाची गुणवत्ता ग्रामिण भागातही मोठ्या संख्येने आहे. त्या गुणवत्तेला एक मोठे व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने महाराष्ट्र श्रीचे यजमानपद यंदा ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेला दिले आणि या ठाण्याने या भव्य दिव्य शरीरसौष्ठव महोत्सवाची धुरा क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष तरे यांच्याकडे सोपवली. या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणेकरांनाच नव्हे तर शरीरसौष्ठवप्रेमींना शरीरसौष्ठवाचा अनोखा थरार पाहायला मिळेल, असा विश्वास ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
मी षटकार ठोकणार -सुनीत जाधव
मी महाराष्ट्र श्री स्पर्धेत आजवर जिंकण्याच्याच इराद्याने उतरत आलोय. मी कधीच कुणाला कमी लेखण्याची चूक करत नाही. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करून दाखवतो आणि मग जेतेपद माझ्या मिठीत आपसूकच येते. नवी मुंबईला लागलेला धक्कादायक निकाल मी टिटवाळ्याला लागू देणार नाही. मी कुठे कमी पडलो, याचा मी अभ्यास केलाय. टिटवाळ्याला मी नक्कीच दाखवून देईन. यावेळी स्पर्धेत जोरदार चुरस पाहायला मिळणार. काँटे की टक्करही होणार. सागर माळी, महेंद्र पगडे, महेंद्र चव्हाण आणि अनिल बिलावा हेसुद्धा जोरदार लढत द्यायला सज्ज आहेत. जिंकणं हे प्रत्येकालाच आवडतं. मलाही जिंकायचंय. मी यासाठी खूप मेहनत घेतलीय. मी केलेली मेहनत महागणपतीच्या आशिर्वादाने नक्कीच साकार होईल. जसं गेल्या पाचवेळी महाराष्ट्र श्रीचा तुरा माझ्या शिरपेचाच खोवला गेला होता, तसाच तो सहाव्यांदाही माझ्याच मुकुटात खोवला जाईल, इतकी पीळदार मेहनत मी केलीच आहे. 6 मार्चला त्यावर शिक्कामोर्तब होईल.
सागर माळी, अनिल बिलावाकडे नजरा
एनएमएसए श्री स्पर्धेत सागर माळीने अप्रतिम शरीरसंपदेचं प्रदर्शन करीत जजेसलाही आश्चर्यचकित केलं होतं. या स्पर्धेत सागरच्या मेहनतीला तोड नव्हती. महेंद्र चव्हाणने त्याला तगडी लढत दिली, पण सागरच सरस ठरला. एकाच गटात हे तिघेही आल्यामुळे 90 किलोचा वजनीगटच चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा गट वाटत होता. या गटात सुनीत चक्क तिसऱया स्थानावर फेकला गेला. त्यामुळे महाराष्ट्र श्री ची उत्कंठा शिगेला पोचली आहे. एकीकडे सागर माळीने महाराष्ट्र श्री स्पर्धेत आपले आव्हान टिकावे म्हणून सर्वस्व पणाला लावले आहे तर अनिल बिलावा मुंबई श्री नंतर थेट महाराष्ट्र श्री खेळणार आहे. गेल्या दोन स्पर्धेत त्याने आपल्या पीळदार आणि आखीवरेखीव देहयष्टीच्या जोरावर साऱयांनाच तोंडात बोटं घालायला लावली होती. तश्शीच कामगिरी करून दाखविण्यासाठी बिलावा सज्ज झाला आहे. सध्या तरी80 किलो वजनी गटात त्याच्यापुढे एकाही खेळाडूचा टिकाव लागणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी काय घडेल, याचा अंदाज आता बांधणे चुकीचे ठरेल.
अमला ब्रम्हचारीला जेतेपदाचे वेध
आपल्या पदार्पणातच फेडरेशन कप जिंकणाऱया अमला ब्रम्हचारीने आपले सारे लक्ष्य महाराष्ट्र श्री स्पर्धेवर केंद्रित केले आहे. मिस महाराष्ट्रसाठी होणाऱया शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अमला सज्ज झाली असून तिला कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. पुण्याची तन्वीर हकसुद्धा चांगल्या तयारीत असून राज्यभरातून किमान सहा-सात महिला शरीरसौष्ठवपटू येणार असल्याची माहिती विक्रम रोठे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही क्रीडाप्रेमींना सौंदर्यवतींचा पीळदार सहभागही पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे फिजीक स्पोर्टस्च्या पुरूष आणि महिला गटातही स्पर्धकांचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असेल, असे अध्यक्ष प्रशांत आपटे म्हणाले