मुंबई - जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टचे फुटबॉलप्रेम जगजाहीर आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबचा चाहता असलेल्या बोल्टने अॅथलेटिक्स म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतर फुटबॉलपटू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलियातील सेंटर कोस्ट मरीनर्स क्लबसोबत त्याचा करारा अंतिम टप्प्यात आहे. क्लबमधील त्याच्या समावेशानंतर अन्य खेळाडूंना बोल्टच्या गतीशी जुळवून घेण्यासाठी भागम् भाग करावी लागणार आहे.नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघाला चिअर करण्यासाठी तो थेट रशियात दाखल झाला होता. आठवेळा ऑलिम्पिक विजेतेपद पटकावणा-या 31 वर्षीय बोल्टने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्यासाठी उत्सुक होता. 100 आणि 200 मीटर शर्यतीत विश्वविक्रम नावावर असलेल्या या खेळाडूने नॉर्वेजीयन क्लब आणि बुंदेसलीगा क्लब बोरूसिया डोर्टमंड क्लबकडून फुटबॉलचे धडे गिरवले आहेत.
आता भागम् भाग.... वेगाचा बादशहा उसेन बोल्ट उतरतोय फुटबॉलच्या मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:37 PM