पॅरिस : जगातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती असलेला उसेन बोल्ट शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीतही सर्वात वेगवान धावपटू असल्याचे सिद्ध झाले. बुधवारी त्याने एअरबसच्या झीरो जी या विशेष विमानात शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत जलद धावण्याचा विक्रम केला.आठवेळा आॅलिम्पिक विजेता असलेल्या उसेन बोल्टने शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात धावण्याचे आव्हान आपल्या दोन सहप्रवाशांना दिले. ते त्याने सहज पूर्ण देखील केले. फ्रेंच अंतराळवीर जेन फ्राँकोई क्लेरवोई, नोवास्पेसचे मुख्यकार्यकारी अधिकारी आॅक्टेव डे ग्वाले यांच्यासोबत उसेनची अंतराळातील ही अनोखी रेस झाली. त्यांनी उसेनला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी ठरले. अंतराळातील रेस जिंकल्यानंतर उसेनने आपल्या सुप्रसिद्ध स्टाईलसह आनंद साजरा केला.तो म्हणाला, ‘मी थोडासा चिंतेत होता, पण जेव्हा पहिले पाऊल पडले. तेव्हा काय वेगळा अनुभव होता. शून्य गुरुत्वाकर्षणाच्या स्थिती चार मिनिटांपेक्षा जास्त काळ वावरल्यानंतर मला चॉकलेटच्या दुकानात एखादे लहान मूल गेल्यासारखा अनुभव येत होता.’ अंतराळ पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने ही रेस आयोजित करण्यात आली होती.
शून्य गुरुत्वाकर्षणातही बोल्ट सुसाट; विशेष विमानात रंगली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:06 AM