मुंबई : दोन महिन्यांपूर्वी नवोदित मुंबई श्री किताब पटकावलेल्या अनिल बिलावा याने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करताना मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचेही जेतेपद पटकावले. यासह एकाच मोसमात या दोन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद उंचावणारा बिलावा पहिला खेळाडू ठरला. त्याचप्रमाणे, महिलांच्या गटात एफएसटी जिमच्या डॉ. मंजिरी भावसारने बाजी मारत ‘मिस मुंबई’ किंताबावर कब्जा केला.बृहन्मुंबई बॉडिबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडिबिल्डिंग आणि फिटनेश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने परळ येथील रेल्वे वर्कशॉप मैदानात झालेल्या या स्पर्धेत दोनशेहून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीने मुंबईकरांवर भुरळ पाडली. ग्लॅमरस वातावरणामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेसाठी तब्बल ५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी उपस्थिती लावत स्पर्धेला वेगळीच रंगत आणली.
एकूण ९ विविध वजनी गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत रोमांचक चुरस पाहण्यास मिळाली. प्रत्येक गटविजेता निवडताना परिक्षकांनाही घाम फुटला होता. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते हर्क्युल्स जिमच्या अनिल बिलावा याने. ८० किलो वजनी गटात सहज बाजी मारल्यानंतर अनिलने ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ याअंतिम फेरीत सकिंद्र सिंग (८५ किलो), महेश राणे (९० किलो) आणि निलेश दगडे (९० किलोवरील) या तगड्या शरीरसौष्ठवपटूंनाही मागे टाकले.विशेष म्हणजे अनिलनंतर ७५ किलो वजनी गटाचा विजेता भास्कर कांबळी याने शानदार प्रदर्शन करताना आपल्याहून अधिक वजनी गटातील खेळाडूंना मागे टाकत उपविजेतेपद पटकावले. त्याचवेळी अभिषेक खेडेकर याने लक्षवेधी सादरीकरण करताना ‘बेस्ट पोझर’चा मान मिळवला.सात खेळाडूंचा सहभाग लाभलेल्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. तळवलकर्सच्या हीरा सोलंकीचे कडवे आव्हान परतावून लावत मंजिरीने आपल्या पहिल्या जेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी ५२ वर्षीय निशरिन पारिख हिने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मात्र, मंजिरी आणि हीरा यांच्या दमदार कामगिरीपुढे तिला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.गटनिहाय निकाल :५५ किलो गट : १. नितीन शिगवण (वक्रतुंड), २. जितेंद्र पाटील (माँसाहेब), ३. राजेश तारवे (माँसाहेब).६० किलो : १. अविनाश वने (आर.एम.भट), २. देवचंद गावडे (परब फिटनेस), ३. आकाश घोरपडे (करमरकर जिम).६५ किलो : १. उमेश गुप्ता (वसंत जिम), २. संदेश सकपाळ (परब फिटनेस), ३. जगदिश कदम (बॉडी वर्कशॉप).७० किलो : १. रोहन गुरव (बाल मित्र व्यायामशाळा), २. संदीप कवडे (एच.एम.बी. जिम), ३. महेश पवार (हर्क्युलस जिम).७५ किलो : १. भास्कर कांबळी (ग्रेस जिम), २. मोहम्मद हुसेन (परब फिटनेस), ३. अमोल गायकवाड (मिशन फिटनेस).८० किलो : १. अनिल बिलावा (हर्क्युलस), २. सुशील मुरकर (जे.एम.के.एम), ३. सुशांत रांजणकर (आर.एम.भट)८५ किलो : १. सकिंद्र सिंग (फॉर्च्युन फिटनेस), २. दिपक तांबीटकर (रिजस फिटनेस), ३. उबेद पटेल (बिस्ट हाऊस जिम).९० किलो : १. महेश राणे (बालमित्र जिम), २. प्रसाद वाळंज ( बॉडी वर्कशॉप ), ३. विजय यादव (परब फिटनेस).९० किलोवरील : १. निलेश दगडे (परब फिटनेस), २. रविकांत पाष्टे (परब फिटनेस)फिजीक स्पोर्टस (पुरूष १७० सेंमी) : १. महेश गावडे ( आर.के.एम.), २.विजय हाप्पे (परब फिटनेस), ३. प्रथमेश बागायतकर (परब फिटनेस).फिजीक स्पोर्टस (पुरूष १७० सेंमीवरील) : १. शुभम कांदू ( बालमित्र व्यायामशाळा), २.आतिक खान ( फॉर्च्युन फिटनेस), ३. स्वराज सिंग ( मेंगन जिम).मिस मुंबई :१. मंजिरी भावसार (एफएसटी जिम), २. हीरा सोलंकी (तळवलकर्स जिम), ३. निशरीन पारीख.