ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 8 - भारताच्या रोहन बोपन्नाने फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. रोहन बोपन्नाने कॅनडाची गाब्रिएला डाब्रोवस्की हिच्या साथीने आज झालेल्या अंतिम लढतीत आर. फराह आणि अली ग्रोनेफिल्ड यांच्यावर 2-6, 6-2, 12-10 अशी मात करत विजेतेपदावर कब्जा केला. बोपन्नाचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तसेच ग्रॅँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा तो लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतरचा तो चौथा भारतीय ठरला आहे.
अटीतटीच्या झालेल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत बोपन्ना आणि डाब्रोवस्कीला पहिल्या सेटमध्ये 2-6 असा पराभव पत्करावा लागला. मात्र पहिला सेट गमावल्यानंतर बोपन्ना आणि डाब्रोवस्की यांनी लढतीत जोरदार पुनरागमन केले. त्यांनी पुढच्या दोन सेटमध्ये जबरदस्त खेळ करत आर. फराह आणि अली ग्रोनेफिल्ड यांच्यावर हुकूमत राखली. बोपन्ना आणि डाब्रोवस्कीच्या इंडो कॅनेडियन जोडीने दुसऱ्या सेटमध्ये 6-2 असा विजय मिळवत लढतीत पुनरामन केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये आर. फराह आणि अली ग्रोनेफिल्ड यांनी कडवी टक्कर देत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण बोपन्ना आणि डाब्रोवस्कीने त्यांची झुंज मोडून काढत हा सेट 12-10 असा जिंकला आणि विजेतेपदावर कब्जा केला. नदाल विजयी, जोको पराभूत
फ्रेंच ओपनचा गतविजेता नोवाक जोकोविच याला आॅस्ट्रेलियाचा सातवा मानांकित खेळाडू डॉमनिक थीम याने पराभवाचा धक्का दिला. थीम याने जोकोविचला ७-६(७-५), ६-३, ६-० असे पराभूत करत खळबळ माजवून दिली. थीमचा उपांत्य फेरीतील सामना आता ९ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदाल याच्यासोबत होणार आहे.
जोकोविच आमि थीम यांच्यातील लढतीत पहिला सेट अटीतटीचा झाला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये थीम याने जोकोवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि गतविजेत्या जोकोविचला एकही गुण मिळवता आला नाही. हा सेट त्याने ६-० अशा मोठ्या फरकाने गमावला. या विजयासोबतच थीम याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नदाल सोबत होईल.