लंडन : भारताचा दुहेरीतील आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने रुमानियाच्या फ्लोरीन मर्जियाच्या सोबतीने खेळताना विम्बल्डन पुरुष दुहेरी गटात सनसनाटी निकाल नोंदवताना संभाव्य विजेत्या व बलाढ्य माइक व बॉब या ब्रायन बंधूना पराभूत करण्याची किमया केली. या धडाकेबाज विजयाच्या जोरावर बोपन्ना - मर्जिया जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश करुन प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला.स्पर्धेत नववे मानांकन असलेल्या बोपन्ना - मर्जिया जोडीने तब्बल दोन तास ३४ मिनिटापर्यंत चाललेल्या लढतीत ब्रायन बंधूचा ५-७, ६-४, ७-६, ७-६ असा पराभव केला. बोपन्ना - मर्जिया जोडीने या सामन्यात तब्बल ३१ विजयी फटके मारले. विशेष म्हणजे त्यातील १७ फटके ‘एस’ होते. त्याचवेळी ५ पैकी ३ ब्रेक पॉइंट वाचवताना त्यांनी ब्रायन बंधूला चांगलेच झुंजवले.बोपन्ना - मर्जिया जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या सेटमधील खेळ पाहताना ब्रायन बंधू सहज बाजी मारेल असे दिसत होते. त्यांचे सामन्यावर नियंत्रण देखील चांगलेच बसले होते. मात्र बोपन्ना - मर्जिया यांनी अनपेक्षितरीत्या झुंज देताना ब्रायन बंधूंना संपुर्ण कोर्टवर नाचवले. स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी बोपन्ना - मर्जिया यांना चौथ्या मानांकीत जीन - ज्यूलियन रॉजर व होरीया तेकाऊ या जोडीविरुध्द होईल. या जोडीने सातव्या मानांकीत मार्सिन मेत्कोवस्की - नेनाद जिमोंजिच या जोडीला ६-४, ६-३, ७-६(२) असे नमवले.दुसऱ्या बाजूला मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झा - ब्रुनो सोरेस (ब्राझील) यांनी उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. द्वितीय मानांकीत सानिया - सोरेस जोडीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात क्रोएशियाच्या मारिन डी - अॅना कोंजुहा जोडीचा ६-३, ७-५, ६-३ असा पराभव केला.
बोपन्ना - मर्जियाचा सनसनाटी विजय
By admin | Published: July 09, 2015 1:16 AM