नवी दिल्ली : फिरकीपटूंना अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे आव्हान असते, अशी प्रतिक्रिया सिनिअर आॅफ स्पिनर हरभजनसिंगने व्यक्त केली. रविचंद्रन आश्विनने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४६ षटके गोलंदाजी करताना १६७ धावांच्या मोबदल्यात केवळ २ बळी घेतले. पण, हरभजनने आश्विनसाठी हा ‘एक निराशाजनक दिवस’ असल्याचे म्हटले आहे. राजकोटमध्ये भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीबाबत बोलताना हरभजन म्हणाला, ‘‘खेळपट्टी आव्हानात्मक असली म्हणजे वेगळा आनंद मिळतो. दिशा व टप्पा अचूक राखून गोलंदाजीमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बळी घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि गोलंदाज म्हणून तुमचे कौशल्य सिद्ध होते.’’पिता झाल्यानंतर हरभजनने क्रिकेटपासून काही वेळ ब्रेक घेतला व ब्रिटनमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविला. आता नागपूरमध्ये तमिळनाडू विरुद्ध पंजाब संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या रणजी लढतीत तो पुनरागमन करण्यास सज्ज आहे. हरभजन म्हणाला, ‘‘पिता होण्याचा अनुभव निश्चितच आनंददायी आहे. माझी मुलगी जीवनातील सर्वांत मोठी भेट आहे. आता मला अन्य कुठल्या बाबीचा विचार करण्याची गरज नाही.’’ (वृत्तसंस्था)
गोलंदाजांना छाप पाडता आली नाही : हरभजन
By admin | Published: November 11, 2016 1:08 AM