- आकाश नेवे
आयपीएलमध्ये ऐरवी होणारे सामने हे फलंदाजी विरुद्ध फलंदाजी असेच असतात. केवळ चौकार आणि षटकारांची बरसात, हे आयपीएलचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअर डेविल्स हा सामना याला अपवाद ठरला. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईला १४२ धावात रोखले आणि मुंबईच्या शिलेदारांनी दिल्लीला ही कमी असलेली धावसंख्यादेखील गाठू दिली नाही. दिल्लीचा कर्णधार जहीर खान याच्यासाठी मुंबईचे वानखेडे स्टेडिअम हे होम ग्राउंडच आहे, त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि मुंबईच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. मुंबईचा सलामीवीर जोश बटलर हा टी २० त आवश्यक असलेला स्ट्राईक रेट राखण्यात यशस्वी झाला. बटलरने १५५ च्या स्ट्राईक रेटने धुलाई केली. पोलार्ड, कृणाल आणि हार्र्दिक यांनी फक्त धावसंख्या वाढवली.
अमित मिश्रा आणि पॅट कमिन्स यांनी मुंबईच्या आक्रमक फलंदाजांना वेसण घातले. युवा स्फोटक नितीश राणा, कर्णधार रोहित शर्मा हे स्वस्तात बाद झाले. अमित मिश्रा याने तर एक षटक मेडन टाकण्याची कामगिरी केली. पॅट कमिन्सनेही चार षटकात २० धावाच दिल्या. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कमी धावांचे हे आव्हान दिल्लीचा संघ सहज पूर्ण करेल, असे वाटत असताना मुंबईच्या मॅकक्लेघनने तीन गडी बाद करताना, दिल्ली डेअर डेविल्सची आघाडी फळी फक्त २१ धावांत तंबूत पाठवली. ३९ चेंडूत २४ धावा आणि सहा बाद, अशी दिल्लीची धावसंख्या होती. दिल्लीच्या फलंदाजीचे आधारस्तंभ असलेले श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रिषभ पंत, कोरे अँडरसन स्वस्तात बाद झाले. या सामन्यात करुण नायरने अत्यंत संथ फलंदाजी केली. त्याने १५ चेंडूंचा सामना करताना ५ धावा केल्या. तर युवा आदित्य तरे हा हार्दिक पांड्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि थ्रोमुळे धावबाद झाला. या परिस्थितीतून दिल्लीला कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस यांनी बाहेर काढले. दोघांनी तुफान खेळी करत संघाला आघाडीवर नेले. दिल्ली जिंकेल, असे वाटत असतानाच मुंबईच्या गोलंदाजीने पुन्हा एकदा दिल्लीला बॅकफुटवर ढकलले. बुमराहने अप्रतिम चेंडूवर रबाडाला बाद केले आणि सामना मुंबईच्या बाजूने फिरला. कागिसो रबाडाचे हे आयपीएल १० मधील पदार्पण होते, त्याचे पर्दापण यशस्वी ठरले.