ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - वन डे सामन्यांमध्ये फलंदाजधार्जीण्या नियमांमुळे गोलंदाजांची यथेच्छ धुलाई होत असतानाच आता आयसीसीने एकदिवसीय सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षणाच्या नियमात बदल करुन गोलंदाजांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आयसीसीच्या समितीने वन डे सामन्यात शेवटच्या १० षटकात ३० यार्ड सर्कलच्या बाहेर ४ ऐवजी ५ खेळाडू ठेवण्याची शिफारस केली असून याशिवाय चेंडूची शिवणमध्येही बदल सुचवले आहेत. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास गोलंदाजांना मोठा दिलासा मिळू शकेल.
आयसीसीने अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून या समितीने आयसीसीकडे काही शिफारसी केल्या आहेत. समितीने वर्ल्डकपमधील सामन्यांचा आढावा घेतला असून यात नवखे संघही ५० षटकांच्या सामन्यात सहजपणे ३०० धावांचा टप्पा ओलांडताना दिसत होते. समितीने याची दखल घेत फलंदाजधार्जीण्या नियमांमध्ये बदल सुचवले आहेत. अंतिम १० षटकांमध्ये क्षेत्ररक्षणात ३० यार्ड सर्कलबाहेर चार ऐवजी पाच खेळाडू ठेवण्याची मूभा द्यावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस या समितीने केली आहे. सध्याच्या नियमानुसार सर्कल बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाजांचा फायदा होतो. याशिवाय गोलंदाजांची चेंडूवरील पकड आणखी घट्ट व्हावी यासाठी चेंडूवरील शिवण वाढवावी असेही या समितीने म्हटले आहे. यामुळे फायदा फिरकी व जलदगती अशा दोन्ही गोलंदाजांना होऊ शकतो. तसेच बॅटच्या स्ट्रॉकसंदर्भातही नियम तयार करण्याची गरज असल्याचे मत समितीने मांडले आहे. येत्या काही दिवसांमध्ये आयसीसीची बैठक होणार असून या बैठकीत अनिल कुंबळे यांच्या समितीने दिलेला अहवाल मांडला जाईल. यातील शिफारशींना आयसीसीने मंजुरी दिली तर वन डे सामन्यात गोलंदाजांना मोठा दिलासा मिळू शकेल.