बंगळुरू : शार्दूल ठाकूर, बेन स्टोक्स आणि जयदेव उनाडकट या त्रिकुटाच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर रायजिंग पुणे सुपर जायंट संघाने आज येथे आपल्या धावसंख्येचा चांगला बचाव करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा २७ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे आयपीएलच्या दहाव्या पर्वात त्यांनी दुसऱ्या विजयाची नोंद केली.प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे (३०) आणि राहुल त्रिपाठी (३१) यांनी सलामीसाठी ६३ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (२७) व महेंद्रसिंह धोनी (२८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली; परंतु त्यानंतर त्यांनी ९ चेंडू आणि ३ धावांच्या आत ५ फलंदाज गमावले. अखेरीस मनोज तिवारीने ११ चेंडूंत २७ धावा ठोकताना पुणे संघाला ८ बाद १६१ या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवात खराब झाली. पुणे संघाने कर्णधार विराट कोहली (१९ चेंडूंत २८) याला बाद करीत आरसीबीला जोरदार धक्का दिला. एबी डीव्हीलियर्स (३० चेंडूंत २९) हादेखील आपला प्रभाव उमटवू शकला नाही.अखेरीस आरसीबी संघाला आपल्या घरच्या मैदानावर ९ बाद १३४ धावाच करता आल्या.पुणे संघाने फक्त ५ गोलंदाजांचा उपयोग केला. स्टोक्सने १८ धावांत ३ आणि शार्दूल ठाकूरने ३५ धावांत ३ गडी बाद केले. उनाडकट याने २५ धावांत २ बळी घेतले. या तिघांना इम्रान ताहिर, डॅनियल क्रिस्टियन यांनी सुरेख साथ दिली.पुणे संघाचा हा आरसीबीवर पहिला विजय आहे. या विजयामुळे रायजिंग पुणे सुपर जायंट संघाचे ५ सामन्यांत ४ गुण झाले आहेत व ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. आरसीबीचा हा पाच सामन्यांतील चौथा पराभव ठरला असून, ते अखेरच्या आठव्या स्थानावर फेकले गेले आहेत.संक्षिप्त धावफलकरायजिंग पुणे सुपर जायंट : २० षटकांत ८ बाद १६१. (राहुल त्रिपाठी ३१, अजिंक्य रहाणे ३०, महेंद्रसिंह धोनी २८, स्टीव्ह स्मिथ २७, मनोज तिवारी नाबाद २७. अॅडम मिल्ने २/२७, एस. अरविंद २/२९, पवन नेगी १/१२, सॅम्युअल बद्री १/३२, शेन वॉटसन १/४४)आरसीबी : २० षटकांत ९ बाद १३४. (डीव्हीलियर्स २९, विराट कोहली २८, केदार जाधव १८, स्टुअर्ट बिन्नी १८. बेन स्टोक्स ३/१८, शार्दूल ठाकूर ३/३५, जयदेव उनाडकट २/२५).
गोलंदाजांनी मिळवून दिला विजय
By admin | Published: April 17, 2017 1:22 AM