कानपूर : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी वारंवार ड्रिंक्स ब्रेक घेतल्यामुळे आमच्या गोलंदाजांची लय बिघडली, अशी प्रतिक्रिया भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केली. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ वर्चस्व मिळवण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बांगर म्हणाले, ‘आम्हाला आज आणखी गोलंदाजी करायला आवडली असती. चेंडू वळायला सुरुवात झाली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे आणि फलंदाजांच्या ड्रिंक्स ब्रेकमुळे आमच्या गोलंदाजांना लय कायम राखता आली नाही. प्रतिस्पर्धी संघ जर या रणनीतीचा वापर करीत असेल तर त्यासोबत जुळवून घेणे आवश्यक आहे.’या खेळपट्टीवर धावा फटकावणे सोपे नसून एक विकेट भारताचे वर्चस्व निर्माण करू शकते. नव्या फलंदाजाला धावा फटकावण्यासाठी संघर्ष करावा लागेल. दुसऱ्या सत्रात आम्ही चांगली गोलंदाजी केली. फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण कायम राखले. प्रत्येक पाहुणा संघ कुठल्यातरी रणनीतीने येतो. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज चांगली फलंदाजी केली. आमची धावसंख्याही एकवेळ १ बाद १५० च्या जवळजवळ होती. चेंडू जुना झाला म्हणजे विकेट मिळण्याची शक्यता बळावते.’ (वृत्तसंस्था)न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (नाबाद ६५) आणि टॉम लॅथम (नाबाद ५६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांच्या अभेद्य भागीदारीदरम्यान अनेकदा ड्रिंक्स ब्रेक घेतला. वारंवार ब्रेकमुळे आमच्या फिरकीपटूंची लय बिघडली, असेही बांगर म्हणाले.
‘किवी फलंदाजांच्या ब्रेकमुळे गोलंदाजांची लय बिघडली’
By admin | Published: September 24, 2016 5:14 AM