बॉक्सर निखत झरीनने ( Nikhat Zareen) आशियाई स्पर्धा २०२३ च्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिने महिलांच्या ५० किलो गटात जॉर्डनच्या हानान नासारचा पराभव करून आशियाई स्पर्धेतील भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. निखतने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाची खात्री केली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीचा सामना अवघ्या १२७ सेकंदात जिंकला. तिने पहिल्याच फेरीत असे आक्रमक पंच केले की सामनाधिकारींना लढत थांबवावी लागली. या विजयासह, निखतने केवळ आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक निश्चित केले नाही तर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला बॉक्सिंगसाठी पहिला कोटा देखील मिळवून दिला. निखत ही दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन आहे.
निखतचे वडील मोहंमद जमील स्वत: खेळाडू होते. ते फुटबॉल, क्रिकेट खेळत. त्यांना चार मुली. निखत तिसरी. आपल्या मुलींनीही खेळावं असं त्यांना वाटे. पण बाकी मुलींना खेळाचा ध्यास नव्हता, आवडीपुरता खेळ मर्यादित राहिला. निखतमध्ये मात्र ते पॅशन होतं. वयाच्या १४ व्या वर्षी ती वर्ल्ड युथ चॅम्पिअन झाली. खेळत होती. साईचं प्रशिक्षणही मिळालं. उत्तम कोचही लाभले. त्यात घरात तिचे काका बॉक्सर. त्यांची मुलं इथेशामुद्दीन आणि इमीशामुद्दीन दोघे बॉक्सर. निजामाबादच्या या कुटुंबाला खेळाचं वेड होतं. पण तेलंगणातल्या छोट्या शहरात मुलींनी खेळाचं मात्र भवताली सर्वांनाच वावडं होतं. त्यात लहान लहान कपडे घालून मुलगी घराबाहेर खेळायला जाते हे तर फारच खूपत होतं. वडील मात्र निखतच्या मागे उभे राहिले.