मेलबोर्न : काही विपरीत परिस्थितीला सामोरे गेल्यानंतरही पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवणाऱ्या आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध सोमवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात काहीही बदल केलेला नाही, पण पाहुणा पाकिस्तान संघ मात्र वेगवान गोलंदाजी आक्रमणामध्ये बदल करण्याचा विचार करीत आहे. आॅस्ट्रेलियाने पहिल्याच कसोटीत खेळणारा संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे युवा फलंदाज निक मॅडिन्सनला स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. त्यानंतर आतापर्यंत कसोटी सामन्यांच्या तीन डावांमध्ये अनुक्रमे शून्य, एक आणि चार अशी धावसंख्या नोंदवली आहे. त्यामुळे झिम्बाब्वेत जन्मलेला अष्टपैलू हिल्टन कार्टराईटला आॅस्ट्रेलियातर्फे पदार्पणाची संधी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचसोबत आॅस्ट्रेलियाने तीन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि जॅक्सन बर्ड आणि फिरकीपटू नॅथन लियोन यांच्यासह सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने वेगवान गोलंदाज राहत अलीच्या स्थानी सोहेल खान किंवा इम्रान खान यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान तीन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसह सहभागी झाला होतो, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकचा कर्णधार मिसबाह-उल-हक म्हणाला, ‘सोहेल कसून मेहनत घेत असून त्याने सराव सामन्यांत बळीही घेतले आहेत. तो नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करीत आहेत. त्याने नव्या चेंडूने दोन-तीन बळी घेतले तर संघाला लाभ होईल. त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग करण्याचीही क्षमता आहे.’ (वृत्तसंस्था) गेल्या डावामुळे पाक संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. पाक संघाला सूर गवसला असून त्याचा दुसऱ्या कसोटी सामन्यात निश्चितच लाभ होईल. गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल, पण जर आम्ही सुरुवातीलाच त्यांना काही धक्के दिले आणि चेंडू रिव्हर्स स्विंग होण्यास सुरुवात झाल्यानंतर आमच्याकडे वर्चस्व गाजवण्याची संधी राहील.- अॅन्डी फ्लावर
बॉक्सिंग डे कसोटीला आजपासून प्रारंभ
By admin | Published: December 26, 2016 1:34 AM