नवी दिल्ली : भारताची सर्वात अनुभवी महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पोलंड येथे सुरु असलेल्या सिलेसियन खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत मेरीने ४८ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत भारताच्या मनीषाने ५४ किलो वजनी गटामध्ये रौप्यपदक पटकावले आहे. भारताने या स्पर्धेत एकूण सात पदके पटकावली आहेत.
मेरीने आतापर्यंत पाचवेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. दुखापतीमुळे मेरीला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. पण ती कसर मेरीने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भरून काढली आहे. या स्पर्धेतील ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मेरीने कझाकिस्तानच्या एगेरीम कासानायेवावर ५-० असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. या वर्षातील मेरीचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा आणि भारतीय खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. बल्गेरिया येथे झालेल्या स्पर्धेत तिने रौप्यपदकही पटकावले होते.
" मेरीने रणनीतीची योग्य अमंलबजावणी केली, त्यामुळेच तिला सुवर्णपदक पटकावता आले. तिच्या खेळामध्ये कसलीही कमतरता नव्हती. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत तिने या अंतिम फेरीवर आपले वर्चस्व राखले होते, " असे भारतीय संघाचे प्रशिक्षक राफाएल बेर्गामास्को यांनी सांगितले.