मुंबई : सामना संपायला काही सेकंद असताना गुणफलक ९-९ अशा बरोबरीत होता. अशा परिस्थितीत बीपीसीएलच्या सुनील काकडेने शेवटच्या चढाईवर दीपक झंझोटला बाद करून अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत एअर इंडियाचे विमान उपांत्यपूर्व फेरीतच रोखले. तसेच दिल्लीच्या आयटीबीपीसह मुंबई आणि महाराष्ट्र या पोलीस संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले. महिला गटात मुंबई पोलीस वि. मध्य रेल्वे तर देना बँक वि. पश्चिम रेल्वे अशा उपांत्य झुंजी रंगतील.गोरेगाव पूर्वेला एमएचबी कॉलनी मैदानात उभारलेल्या कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी क्रीडा नगरीत स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पोलीस आणि रेल्वेचे वर्चस्व दिसले. तसेच मुंबई पोलिसांच्या दोन्ही संघांनी दोन्ही गटांत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात बीपीसीएलने एअर इंडियावर ७-५ अशी आघाडी घेतली होती. दोन्ही संघ सावध खेळ करीत होते. बीपीसीएलचे जितेश जोशी, नीलेश शिंदे हे संघाच्या प्रत्येक गुणासाठी जोरदार टक्कर देत होते; तर एअर इंडियाकडून प्रशांत चव्हाण आणि दीपक झंझोटचा जोरदार खेळ सुरू होता; पण शेवटी या थरारक सामन्याचा निकाल शेवटच्या चढाईवरच लागला. आता अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्यांना महाराष्ट्र पोलिसांना नमवावे लागणार आहे.अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत दिल्लीच्या आयटीबीपीने पालघरच्या एचआयडीएलचा ३३-१0 असा धुव्वा उडवला. रोहितने एकाच चढाईत पाच गडी बाद करून एचआयडीएलवर लोण चढवला. आता आयटीबीपीची गाठ मुंबई पोलिसांशी पडेल. महाराष्ट्र पोलिसांना महिंद्राची २३-१0 अशी धूळधाण उडवली.महिलांच्या गटात मध्य रेल्वेने पाटणकर फार्मसीचा ३२-९ असा सहज पराभव केला तर पश्चिम रेल्वेने रेल्वे पोलिसांचे आव्हान २६-१२ असे संपुष्टात आणले. (क्रीडा प्रतिनिधी)
बीपीसीएल उपांत्य फेरीत
By admin | Published: February 04, 2015 2:50 AM