मेलबोर्न : ‘महान फलंदाज डॉन ब्रॅडमन सध्याच्या काळात असते, तर इतके यशस्वी झाले नसते,’ असे म्हणत आॅस्ट्रेलियाचे माजी जलदगती गोलंदाज रॉडने हॉग यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
हॉग म्हणाले, ‘‘सध्याच्या युगात ९९.९४च्या सरासरीने त्यांना धावा करता आल्या नसत्या. मला माहीत आहे, की हे मी जे बोलत आहे, ते कदाचित उद्धटपणाचे वाटत असेल; मात्र आताच्या तुलनेत १९२० ते १९५० या काळात फलंदाजी करणे हे सोपे होते. ब्रॅडमन ही एक लाट होती; मात्र या काळात असते तर त्यांना ९९च्या सरासरीने धावा करता आल्या नसत्या, असे मला वाटते.’’सत्तर-ऐंशीच्या दशकात आॅस्ट्रेलियाकडून खेळलेले हॉग यांनी यासाठी विविध काळातील फलंदाजांच्या सरासरीच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. इंग्लंडकडून खेळलेल्या फलंदाजांच्या सरासरीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ५० पेक्षा जास्त सरासरी असलेल्या फलंदाजांची तुलना त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘आधुनिक काळातील फलंदाजांची सरासरी पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ग्रॅहम गुच (४२), डेव्हिड गॉवर (४३), अॅलन लॅम्ब (४०) जेफ्री बॉयकॉट (४७), केविन पीटरसन (४७) यांच्या तुलनेत १९२० ते १९५० या काळातील वाल्टर हॅमंड (५८), हर्बर्ट सटक्लिफ (६०), हटन (५६), हॉब्स (५६) यांची सरासरी चांगली होती. खेळाडूंच्या सरासरीचा अभ्यास करूनच मी हे म्हणू शकतो, की सर ब्रॅडमन जर सध्याच्या काळात असते, तर त्यांना ९९.९४च्या सरासरीने धावा काढता आल्या नसत्या.’’ हॉग यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेटविश्वात नव्या वादाला प्रारंभ झाला आहे. सोशल मीडियावर या संदर्भात क्रिकेटरसिकांनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. सर ब्रॅडमन हे सर्वकालीन महान खेळाडू असून, आॅस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींच्या हृदयात त्यांना मानाचे स्थान आहे.