पोर्ट आॅफ स्पेन : मानधनाच्या कारणामुळे भारताचा दौरा अर्ध्यावर सोडल्यामुळे वादात सापडलेला वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे़ आता संघाचे नेतृत्व युवा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर याच्याकडे सोपविण्यात आले आहे़ विशेष म्हणजे ब्राव्होचा विंडीज वन-डे संघातूनही पत्ता कट झाला आहे़ ब्राव्होव्यतिरिक्त अनुभवी डॅरेन सॅमी आणि किरोन पोलार्ड यांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या वन-डे मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे़ या तिन्ही खेळाडूंना मात्र विंडीज टी-२० संघात स्थान मिळाले आहे़ टी-२० संघाचे नेतृत्व डॅरेन सॅमी याच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे़ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिकाही खेळविण्यात येणार आहे़ ही सीरिज ९ ते १४ जानेवारीपर्यंत चालणार आहे़ वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने (डब्ल्यूआयसीबी) सांगितले की, क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सर्वानुमते ब्राव्होऐवजी २३ वर्षीय होल्डरची वेस्ट इंडिज वन-डे संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे़ होल्डरने फेब्रुवारी २०१३ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती़ आतापर्यंत त्याने २१ सामन्यांत २९ बळी मिळविले आहेततसेच वेस्ट इंडीज अंडर १९ संघ आणि ‘अ’ संघाकडून खेळताना आपल्या खेळाने प्रभावित केले आहे़ (वृत्तसंस्था)
कर्णधारपदावरून ब्राव्होची उचलबांगडी
By admin | Published: December 22, 2014 4:50 AM