दुखापतीतून सावरणाऱ्या नीरज चोप्रानं दमदार कमबॅक करताना दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या सेंट्रल नॉर्थ इस्ट स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली. त्यानं 87.86 मीटर भालाफेक करताना टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील पात्रता निश्चित केली. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशननंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
2018च्या ऑगस्ट महिन्यात नीरजनं आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यात त्यानं 88.06 मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रमासह हे सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर 2019मध्ये त्याला दुखापतीमुळे बराच काळ स्पर्धांपासून दूर रहावे लागले. त्यातून पूर्णपणे तंदुरुस्त होताना नीरजनं झोकात पुनरागमन केले.
तो म्हणाला,''सत्रातील सराव स्पर्धा म्हणून मी येथे दाखल झालो होतो. त्यामुळे पहिल्या तीन थ्रोमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर चौथ्या प्रयत्नात आणखी दूर भालाफेक करण्याचे मी ठरवले आणि ऑलिम्पिक पात्रताच निश्चित केली. या कामगिरीने आनंदी आहे.''