नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 65 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. बजरंगने यापूर्वीच 2020 मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली होती. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत तीन पदके पटकावणारा बजरंग हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
बजरंगने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाच्या जाँग सोलचा 8-1 असा पराभव केला. बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री व राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत. त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले.