भारताची यशस्वी बॉक्सर मेरी कोमनं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारतासाठी एक पदक निश्चित केलं. मेरी कोमनं उपांत्यपूर्व फेरीत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इंग्रीट व्हॅलेन्सियाला 5-0 असे सहज नमवले. मेरीचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आठवे पदक ठरले आहे. मेरीनं यापूर्वी जागतिक स्पर्धेत सहा सुवर्णपदकं आणि एक रौप्यपदक जिंकले आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना मेरी कोमनं थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला होता. जागतिक स्पर्धेत आठ पदकं जिंकणारी मेरी ही पहिली व एकमेव महिला बॉक्सर आहे.
मेरीनं 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर 2001 मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शिवाय 2010 आणि 2014च्या आशियाई स्पर्धेत तिच्या नावावर अनुक्रमे कांस्य व सुवर्णपदक जमा आहे. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिनं सुवर्ण कमाई केली आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर मेरी म्हणाली,''खूप आनंदी आहे. मलाही आताच कळलं की जागतिक स्पर्धेत आठ पदकं जिंकणारी मी पहिलीच खेळाडू ठरली, त्यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे. आता सुवर्णपदक पटकावण्याचा प्रयत्न करेन.''