मुंबई : सध्याच्या घडीला देशामध्ये निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा येथे विधानसभेच्या निवडणूका महिन्याभरात होणार आहेत. या निवडणूकी पाहून भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आपल्या पक्षामध्ये दोन खेळाडूंना प्रवेश दिला आहे.
भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला दिल्लीमधून सीट दिली होती. गंभीर यावेळी निवडणून येऊन खासदारही झाला आहे. आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने दोन मोठ्या खेळाडूंना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे.
विधानसभेच्या निवडणूकीमध्ये या दोघांनाही उभे करण्यात येऊ शकते. पण या दोघांना कोणत्या मतदार संघातून जागा द्यायची, याचा विचार सध्या भाजपा करत आहे. पण हे दोन खेळाडू कोण, याचा विचार तुम्ही करत असाल.
भारताला ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तला भाजपाने आपल्या पक्षामध्ये आज सामील करून घेतले आहे. योगेश्वरने आतापर्यंत कुस्ती विश्वामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याच्या चरित्रावर कोणाताही डाग नाही. कोणत्याही वादामध्ये योगेश्वर अडकलेला नाही. त्यामुळे योगेश्वरची निवड भाजपाने केली असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंगलाही भाजपाने आज सामील करून घेतले आहे. हरयाणामध्ये हॉकीचे प्रचंड वेड आहे. संदीप तर भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. त्यामुळे त्याला हरयाणामध्ये चांगला मान आहे. त्यामुळे जर संदीप निवडणूकीसाठी उभा राहीला तर तो जिंकून येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपाने आपल्या पक्षात संदीपला जागा दिल्याचे म्हटले जात आहे.