भारताच्या विनेश फोगाटनं बुधवारी जागतिक कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनी गटाच्या रेपेचेस फेरीतील दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवून 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट पक्कं केलं. टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट पटकावणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. तिनं बुधवारी रेपेचेस फेरीतील दुसऱ्या सामन्यात जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या साराह हिल्डेब्रँत्ड ( अमेरिका) हीचा 8-2 असा पराभव केला. या विजयासह तिनं कांस्य पदकाच्या शर्यतीतही प्रवेश केला आहे.
विनेशला मंगळवारी जापानच्या विद्यमान जग्गजेत्या मायु मुकैदाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ती जागतिक अजिंक्यपदच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मात्र, मुकैदाने 53 किलोच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानं विनेशच्या रेपेचेसद्वारे कांस्य पदकाच्या आशा कायम राहिल्या.
विनेश फोगाटची कामगिरीविनेशनं 2014 आणइ 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे 48 व 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. शिवाय 2014च्या आशियाई स्पर्धेत तिनं 48 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. मात्र, 2018साली जकार्ता येथे झालेल्या सामन्यात तिने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. त्याशिवाय तिच्या नावावर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन रौप्य व तीन कांस्यपदक आहेत.