जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी भारतीय कुस्तीपटूंनी धमाकेदार कामगिरी केली. नुकताच राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या बजरंग पुनियानं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्याच रवी कुमार दहीयानेही 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या कामगिरीसह दोघांनी 2020 मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली. बुधवारी विनेश फोगाटने भारताकडून ऑलिम्पिक तिकीट मिळवण्याचा पहिला मान पटकावला होता. रवी कुमारने उपांत्यपूर्व फेरीत माजी जागतिक विजेत्या युकी ताकाहाशीचा 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 23 वर्षांखालील जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या रवी कुमारला उपांत्य फेरीत गतविजेत्या झौर युगूएव्हचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे बजरंगने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाच्या जाँग सोलचा 8-1 असा पराभव केला. बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री व राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत. त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले.
दरम्यान, 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला रित्या हातानं माघारी परतावे लागले. 62 किलो वजनी गटात तिला राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या एडेनियी ( नायजेरिया) हीने 10-7 असे पराभूत केले.