बर्मिंगहॅम : समृद्धतेने नटलेल्या ब्रिटनचा सांस्कृतिक वारसा आणि सर्वसमावेशकतेचे अद्भुत दर्शन घडविणाऱ्या शानदार उद्घाटन सोहळ्याद्वारे शुक्रवारी पहाटे २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झाला. ड्रम वादक अब्राहम टेटेह याच्या वादनाने अलेक्झांडर स्टेडियममध्ये सुरुवात होताच भारतीय शास्त्रीय गायिका आणि संगीतकार रंजना घटक यांनी बहारदार सादरीकरण केले. कोविडनंतर कुठल्याही प्रतिबंधाविना आयोजित होणारे हे पहिलेच मोठे आयोजन आहे.
शहरातील मोटार उद्यागोची झलक म्हणून लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या ७० कारच्या माध्यमातून ब्रिटिश ध्वज युनियन जॅक साकारला. महाराणी एलिझाबेथ यांचे प्रतिनिधी प्रिन्स चार्ल्स हे स्वत:च्या एस्टन मार्टिन कारने दाखल झाले. या शहराचे नायक बनलेले महान चार्ली चॅपलिन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर महान लेखक विलियम शेक्सपियर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यानंतर शुभंकर ‘पेरी द बुल’चे मैदानात आगमन झाले. मागच्या वेळी ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे स्पर्धा झाल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पथक ७२ देशांच्या खेळाडूंच्या पथसंचलनात सर्वांत आघाडीवर होते. २०१० चा यजमान भारताचा क्रम येताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भारतीय पथकाचे नेतृत्व केले.