नवी दिल्ली : बहुचर्चित बृजभूषण शरण सिंग आणि त्यांचा मुलगा करण हे भारतीय कुस्ती महासंघाच्या आगामी निवडणुकीच्या मैदानात उमेदवारी दाखल करणार नाहीत, हे निश्चित झाले आहे. पण त्यांचा जावई विशाल सिंग बिहारचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कुस्ती महासंघाची निवडणूक १२ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यासाठी मतदान करणाऱ्या राज्यांच्या प्रतिनिधींची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली; मात्र ज्या व्यक्ती त्या त्या राज्यांशी संबंधित नाहीत, त्यांची नावे त्या त्या राज्यांचे प्रतिनिधी म्हणून कळविण्यात आली आहेत. कुस्ती महासंघाच्या घटनेनुसार राज्य संघटनेच्या कार्यकारी समितीतीलच व्यक्ती त्या राज्यातून निवडणूक प्रक्रियेचा भाग असू शकतो किंवा उमेदवार असू शकतो; पण घटनेतील या नियमाला यंदा बगल देण्यात आली आहे.
बृजभूषण सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातील साक्षीदार अनिता शेराॅन ओडिशाच्या प्रतिनिधी असतील.
३८ वर्षीय अनिताने २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेक पदक जिंकले आहे. ती मूळची हरयाणातील असून तेथे पोलिस दलात नोकरी करते. त्याचप्रमाणे प्रेमचंद लोचाब गुजरात राज्याचे प्रतिनिधी असतील. प्रेमचंद रेल्वे क्रीडा बोर्डाचे सचिव आहेत.