Brij Bhushan Singh son, Vinesh Phogat Disqualified, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला बुधवारी सकाळी मोठा धक्का बसला. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट आज आपला सुवर्णपदकाचा सामना खेळणार होती. पण सामन्यासाठी करण्यात येणाऱ्या वजनाच्या वेळी तिचे वजन नियमापेक्षा १०० ग्रॅम जास्त भरले. विनेश फोगाट महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत फायनल खेळणार होती, पण वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. तिला वजन कमी करण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा, अशी मागणी भारताकडून करण्यात आली होती. पण ती मागणी फेटाळण्यात आली. या साऱ्या प्रकरणानंतर, बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपा नेते ब्रृजभूषण शरण सिंह यांचा भारतीय कुस्तीपटूंशी बराच काळापासून वाद सुरु होत. कालच्या विनेशच्या विजयानंतर अनेकांनी सोशल मीडियावर बृजभूषण सिंह यांना ट्रोल केले होते. तशातच आज विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याचा निकाल आल्यानंतर बृजभूषण सिंह काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष होते. पण सध्या तरी त्यांचा मुलगा आणि केसरगंजचे खासदार करण भूषण सिंह यांनी विनेश फोगटच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. विनेशला अपात्र ठरवल्याबद्दल भाजपा खासदार करण भूषण सिंग म्हणाले, "हे देशाचे नुकसान आहे. महासंघ या प्रकरणात आवश्यक ते लक्ष देईल आणि याबाबत काय करता येईल ते पाहील."
मंगळवारी क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत विनेशने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यंदाच्या तिच्या ऑलिम्पिकमधील सेमीफायनलपर्यंतच्या वाटचालीकडे पाहता ती भारताला नक्कीच सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्वास होता. पण आज जेव्हा फायनलआधी ठरलेल्या वेळी विनेशचे वजन केले. त्यावेळी तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त भरले आणि तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी दिला धीर
"विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहात. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. दमदार पुनरागमन कर! आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत," असे धीर देणारे ट्विट मोदींनी केले.