Wrestlers Stage Protest: "गरज पडल्यास काहीही करू शकतो...", बैठकीआधी ब्रिजभूषण सिंह यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 10:42 AM2023-01-20T10:42:12+5:302023-01-20T10:43:47+5:30
brijbhushan sharan singh news: भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर बुधवारपासून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात (WFI) ऑलिम्पियन खेळाडू आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्याप भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, "प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे." लक्षणीय बाब म्हणजे ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, पैलवान बजरंग पुनिया याने सरकारला इशारा देत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याने काल एक मोठे विधान करताना म्हटले, "जर आम्ही आमच्या देशासाठी लढू शकतो तर आम्ही आमच्या हक्कांसाठी देखील लढू शकतो." अशा शब्दांत ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिल्लीच्या जंतरमंतरवरून इशारा दिला आहे. तसेच चॅम्पियन कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांनी देखील आंदोलनस्थळी हजेरी लावली. सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आंदोलकांचे प्रश्न आज सुटावेत यासाठी मी प्रयत्न करेन, असा विश्वास बबिता फोगाट यांनी आंदोलक खेळाडूंना दिला.
ब्रिजभूषण सिंह यांचे स्पष्टीकरण
अशातच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी याविषयी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज पत्रकार परिषद बोलावली आहे. तसेच कार्यकारणीची बैठक बोलावली असून त्यामध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य असल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले. "गरज पडल्यास काहीही करू शकतो पण, इथे बदल्याची कारवाई करण्याची काहीच गरज नाही. ऑलिम्पिक खेळाडूंच्या पदकांमध्ये माझा देखील हात आहे. मी त्यांना प्रशिक्षण, सल्ले दिले म्हणून हे साध्य झाले आहे. खेळाडू मागील 15 दिवसांपूर्वी मला कुस्तीचा देव म्हणत होते आता अचानक असे काय झाले?", असे त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
Wrestling Federation of India (WFI) President Brij Bhushan Sharan Singh is to now hold a press conference after 4pm at the Wrestling Training Centre in Nawabganj, Gonda district, Uttar Pradesh, today. https://t.co/1Aw2Y0NxO9pic.twitter.com/KB5H4H6BAH
— ANI (@ANI) January 20, 2023
कॉंग्रेसवर फोडलं खापर
तसेच खेळाडूंच्या आंदोलनाच्या मागे राजकीय शक्ती असल्याचा आरोपही ब्रिजभूषण सिंह यांनी केला. आंदोलनाला कॉंग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी हजेरी लावली यावरून त्यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. माझ्या खांद्यावरून कॉंग्रेस भाजपावर निशाणा साधून अस्तित्व राखण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली.
महिला पैलवानांवर अत्याचार केल्याचा पुरावा आहे - पुनिया
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाने गंभीर आरोप केले आहेत. "आमच्यासोबत 5-6 महिला कुस्तीपटू आहेत ज्यांनी या अत्याचारांचा सामना केला आहे आणि आमच्याकडे ते सिद्ध करण्यासाठी पुरावे देखील आहेत", असा इशारा ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिला आहे. तसेच आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून सरकारकडून आम्हाला कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. ब्रिजभूषण सिंह राजीनामा देतील आणि तुरुंगात जातील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही नक्कीच गुन्हा दाखल करू, असे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सांगितले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"