वाराणसी - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या खेळाडूला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना मोक्याच्या वेळी येऊन तिचा जीव वाचवला. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकूण देणारी वेटलिफ्टर पूनम यादव आणि तिच्या मावस बहिणीला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाराणसी पासन जवळ असेलेल्या मुंगवार येथे शनिवारी हा सगळा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पूनम आपल्या मावशीला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या मावशीच्या घरच्यांसोबत शेजाऱ्यांचे भांडण झाले आणि भांडणाचे रुपांतर मारहाणीत झालं. त्यावेळी पूनम मध्यस्थी करण्यासाठी गेली असता शेजाऱ्यांनी तिलाही विट आणि दगडाने मारहाण केली.
पूनम आणि तिच्या बहिणीने कसाबसा जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला. पूनमच्या गाडीचीही तोडफोड झाली आहे. मोक्याच्यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर हजेरी लवली. जखमी पूनमला पोलिसांनी रुग्णावाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रोहनिया पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. पूनमची मावशी आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये आधीपासूनच जमिनिवरून वाद असल्याची माहिती समोर आली आहे. पूनमने वेटलिफ्टिंगमध्ये 69 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. पूनम शुक्रवारी भारतात परतली, त्यावेळी तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूनमला 50 लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केलं आहे.