पणजी : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोव्याच्या तानिशा क्रास्तो हिने बल्गेरियन ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेत तिने दुहेरी गटात खेळताना उत्तराखंडच्या आदिती भट्ट हिच्यासह खेळताना ही कामगिरी केली. उल्लेखनीय म्हणजे, तानिशाचे हे सलग तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. तिने ज्या-ज्या स्पर्धेत भाग घेतला त्या-त्या स्पर्धेत सुवर्णमय झेप घेतली आहे. स्पर्धेत भारतीय संघाने सहा पदके पटकाविली. यामध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेत तानिशा-आदिती ही जोडी मुलींच्या दुहेरी गटात खेळली. या दोघींत पुन्हा एकदा उत्कृष्ट ताळमेळ दिसून आला. या जोडीने अंतिम सामन्यात तुर्कीच्या अव्वल मानांकित जोडीचा म्हणजे बेंगिसू इर्सेटिन-झेहरा इर्डाेफ या जोडीचा २१-१५, १८-२१, २१-१८ ने पराभव केला. महिला एकेरी गटात भारताच्या सौम्या इमाद फारुकी हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एनास्तिसिया शापोवालोवा हिचा ९-२१, २१-१२, २२-१० ने पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. मिश्र दुहेरीत एडविन ज्योय आणि श्रुती मिश्रा या जोडीने कमाल केली. त्यांनी दुसºया मानांकित ब्रिटीश जोडीचा २१-१४, २१-१७ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. मुलांच्या दुहेरी गटात, ईशान भटनागर आणि विष्णुवर्धन यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मालविका बन्सोड ही दुसºया मानांकित रशियाच्या अनास्तासिया हिच्याकडून पराभूत झाली. तिला कांस्यपदक प्राप्त झाले. "तानिशा ज्या पद्धतीने खेळात उंची गाठत आहे ते पाहून खूप आनंद होतोय. निश्चितच, तिच्या कामगिरीचा गोव्याला अभिमान असेल. कमी वेळेत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. मला तिचा अभिमान वाटतो," असे तानिशाचे वडील क्लिफोर्ड क्रास्तो यांनी सांगितले.
बल्गेरियन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या तानिशाची सुवर्णझेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 7:55 PM