सध्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा थरार रंगला असून मंगळवारी भारताची शिलेदार सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. आज माजी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन्स पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा आमनेसामने होत्या. सुरूवातीपासूनच वर्चस्व राखलेल्या जपानच्या नोझोमीने भारतीय स्टार सिंधूला पराभवाची धूळ चारली. खरं तर मागील वर्षभरापासून सिंधूची गाडी विजयाच्या पटरीवरून खाली उतरल्याचे दिसते. पहिल्या गेममध्ये जपानच्या खेळाडूनं मोठी आघाडी घेतली. १४-२१ अशा फरकानं नोझोमीनं बाजी मारली अन् सिंधू ७ गुणांनी पिछाडीवर राहिली.
दुसऱ्या गेममध्ये देखील जपानच्या खेळाडूचा वरचष्मा पाहायला मिळाला. पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या सिंधूला पुन्हा एकदा अपयश आलं आणि ती १४-२१ अशी पिछाडीवर राहिली. सिंधूला जपानच्या ओकुहाराकडून २१-१४, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे पहिला गेम गमाविल्यावरही दुसऱ्या गेमला ९-० अशी मोठी आघाडी मिळवूनही सिंधूला नंतर केवळ पाचच गुण मिळविता आले अन् जपानच्या खेळाडूनं तोंडचा घास पळवला. ही जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची २८ वी आवृत्ती आहे, जी २१ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान कोपनहेगन, डेन्मार्क येथे खेळवली जात आहे.
सर्वाधिक पदकं सिंधूच्या नावावर भारताच्या सिंधूने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. २०१९ मध्ये सिंधूने महिला एकेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूला काही खास कामगिरी करता आली नाही, तिला एकही पदक जिंकता आलं नाही. भारताने १९७७ पासून जागतिक स्पर्धेत एक सुवर्ण, चार रौप्य आणि १३ पदके जिंकली आहेत.