हुएलवा (स्पेन) : गत चॅम्पियन भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिने गुरुवारी थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग हिच्यावर सरळ गेममध्ये मात करीत बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती, जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूला अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू चायनीज तायपेईची ताय चू यिंगविरुद्ध खेळावे लागेल.
सिंधूने दहाव्या स्थानावरील पोर्नपावीला ४८ मिनिटात २१-१४, २१-१८ ने पराभूत केले. सिंधूचा पोर्नपावीविरुद्ध आठ सामन्यात हा पाचवा विजय ठरला. तीनवेळा सिंधू पराभूत झाली होती. या विजयासह यंदाच्या दोन पराभवांचा सिंधूने वचपा काढला. बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्सच्या गटातील सामन्यात आणि त्याआधी मार्चमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सिंधू पोर्नपावीकडून पराभूत झाली होती. अन्य एका सामन्यात चू यिंगने स्कॉटलंडची क्रिस्टी गिलमोरचा २१-१०, १९-२१, २१-११ ने पराभव केला.
सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासूनच वर्चस्व राखून विजय मिळविला. दुसऱ्या गेममध्ये थोडी चुरस गाजली. ब्रेकपर्यंत सिंधू ११-६ ने पुढेही होती, यानंतर झालेल्या दीर्घ रॅलीत थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने गुण संपादन केले. पोर्नपावीने हा गेम १८-१९ असा रंगतदार केला होता. तथापि सिंधूने अनुभव पणाला लावून गेम आणि सामनाही जिंकला. पहिल्या फेरीत पुढे चाल लाभलेल्या सिंधूने मंगळवारी स्लोव्हाकियाची मार्टिना रेपिस्का हिच्यावर २१-७, २१-९ ने मात केली होती.