बँकॉक : भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व किदाम्बी श्रीकांत गुरुवारी येथे बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्सच्या आपल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही बॅडमिंटनपटू बाद फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाले आहेत. आठवडाभरापूर्वी विश्व चॅम्पियन सिंधूला रतचानोक इंतानोनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, यावेळीही त्यापेक्षा काही वेगळे घडले नाही. तिसऱ्या मानांकित थायलंडच्या खेळाडूने १८-२१, १३-२१ ने सहज विजय मिळविला.
श्रीकांतला तायवानच्या वांग जू वेईविरुद्ध एका गेमची आघाडी घेतल्यानंतर पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या खेळाडूविरुद्ध श्रीकांतची कामगिरी ३-० अशी होती. वांगने एक गेमने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करताना १९-२१, २१-९, २१-१९ ने विजय नोंदवला. त्याआधी, श्रीकांत व वांग यांच्यादरम्यान ९-९ अशी बरोबरी होती. त्यानंतर श्रीकांतने ११-१० अशी आघाडी घेतली आणि ब्रेकनंतर त्याने १५-११ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने रॅलीमध्ये वर्चस्व गाजवत १७-१२ अशी आघाडी घेतली.
‘आज माझा दिवस नव्हताच. पहिला गेम गमाविल्यामुळे फरक पडला. माझे टायमिंगही चांगले नव्हते, त्यामुळे मी निराश आहे.’-पी. व्ही. सिंधू
‘मला चुरशीच्या लढतीत विजय मिळविण्याची पद्धत शोधावी लागेल. मी तिसऱ्या गेममध्ये बराच वेळ त्याच्यावर वर्चस्व गाजवले; पण अखेर पराभव स्वीकारावा लागला. - किदाम्बी श्रीकांत