ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २० - कोलकात्यात क्रिकेट सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना जखमी झालेल्या २० वर्षाच्या अंकित केसरी या क्रिकेटपटूचा सोमवारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुण खेळाडूचा मैदानात मृत्यू झाल्याने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.
शुक्रवारी कोलकाता येथे इस्ट बंगाल क्लब व भवानीपूर क्लब यांच्यात सामना सुरु होता. ४४ व्या षटकादरम्यान झेल पकडण्याच्या प्रयत्नात सौरव मंडल व अंकित केसरी या दोघांची टक्कर झाली. यात अंकितच्या डोक्यालाही दुखापत झाली. यानंतर अंकित मैदानातच बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी अंकितला ह्रदविकाराचा झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. उमद्या क्रिकेटपटूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्रिकेट क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजेसचाही डोक्याला चेंडू लागल्याने मृत्यू झाला होता. याशिवाय इस्त्रायलमध्ये एका पंचाचा तर पाकिस्तानमध्येही एका क्रिकेटपटूचा सामन्यादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती.