आॅकलंड : या वेळी विश्वकप आमचा आहे, अशी घोषणा अनेक वर्षे चोकर्सच्या शिक्क्यासह खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डिव्हिलियर्सने केली आहे.न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीच्या पूर्वसंध्येला डिव्हिलियर्सच्या देहबोलीतून अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार व्यक्त होत होता. यापूर्वी विश्वकप स्पर्धेत उभय संघांना अंतिम फेरी गाठण्यात यश मिळालेले नाही. डिव्हिलियर्स म्हणाला, ‘आमचा आत्मविश्वास उंचावलेला असून योग्य वेळी सूर गवसला. आम्ही लौकिकाला साजेसा खेळ केला तर या स्पर्धेत आम्हाला कुणीच रोखू शकत नाही.’यापूर्वी न्यूझीलंडमध्ये उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या मालिकेत द. आफ्रिकेने २-० ने विजय मिळविला होता, पण विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी सराव सामन्यात न्यूझीलंडने सरशी साधली होती. यापूर्वी विश्वकप स्पर्धेत उभय संघांदरम्यान सहा सामने खेळले गेले आहेत. त्यात न्यूझीलंडने चार सामने जिंकले, तर दोन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विश्वकप स्पर्धेत गेल्या तीन सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळविला आहे. डिव्हिलियर्स म्हणाला, ‘इतिहासाचा विचार न करता २०१५ मध्ये संघ कशी कामगिरी करतो, याला अधिक महत्त्व आहे. भूतकाळातील आमच्या कामगिरीला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. आम्ही जर चांगली कामगिरी केली तर निश्चितच विजय मिळवता येईल. संघ म्हणून आम्हाला आमच्या कामगिरीवर विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)
आम्हाला क ोणी रोखू शकत नाही : डिव्हिलियर्स
By admin | Published: March 24, 2015 1:00 AM