मॅनहॅम : अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या महिला भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या सामन्यात कॅनडाला पराभूत केले. भारतीय संघाने कॅनडावर ३-१ अशा गोलफरकाने विजय संपादन केला. या दौऱ्यातील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.पेनिसिल्व्हेनियामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या पूनम राणीने १९ व्या मिनिटाला, रेणुका यादवने ३२ व्या, तर अनुराधा थोकचोमने ५८ व्या मिनिटाला गोल केला.
भारताने सुरुवातीच्या काही मिनिटांतच आक्रमक खेळ करीत कॅनडाला बॅकफूटवर टाकले. रोव्हन हॅरिसने गोल करण्याचा केलेला प्रयत्न भारताच्या बचावफळीने हाणून पाडला. त्यानंतर पूनम राणीने पहिला गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली; मात्र लगेचच कॅनडाच्या नताली सुरेसियूने गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान, कॅनडाला पेनल्टी मिळाली; मात्र भारताने याचे रूपांतर गोलमध्ये होऊ दिले नाही. मध्यंतरापर्यंत १-१ अशी बरोबरी राहिली.
उत्तरार्धात भारतीय संघाने आपल्या खेळाला आणखी आक्रमकतेची जोड दिली. ३२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत रेणुकाने भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या दरम्यान भारताच्या दीप ग्रेसला गोल करण्याची संधी मिळाली होती; मात्र तिला याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. शेवटच्या काही मिनिटांत कॅनडाने वारंवार गोलपोस्टवर आक्रमण केले, मात्र भारताच्या बचावफळीने त्यांना गोल करू दिला नाही. सामना संपण्यासाठी दोन मिनिटे शिल्लक असताना भारताच्या अनुराधाने गोल करत भारताला ३-१ ने विजय मिळवून दिला. २६ जुलैला भारत- कॅनडा पुन्हा एकदा मैदानात भिडणार आहेत.